शहरात ई-बसची सेवा लवकरच

शहरासाठी 50 विद्युत बसची मागणी, चार्जिंग केंद्राचे 90 टक्के काम पूर्ण

अमरावती / 2 नोव्हेंबर – शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने विद्युत बससेवा सुरू करण्याची तयारी केली असून, नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान ई-बस सेवा योजनेअंतर्गत शहरासाठी 50 विद्युत बस मंजूर झाल्या आहेत. या बस प्रमुख मार्गांसह अरुंद अंतर्गत रस्त्यांवरही धावणार आहेत. त्यासाठी दिल्लीतील केंद्रीय मंत्रालयाकडे 50 बस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली असून, बडनेरा येथील चार्जिंग केंद्राचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले आणि परिवहन व्यवस्थापक यांनी 30 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री आणि अधिकार्‍यांची भेट घेऊन बस उपलब्धतेबाबत चर्चा केली. नोव्हेंबरमध्ये बस मिळाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील रस्त्यांची रुंदी आणि परिस्थिती पाहून बसचे मार्ग निश्चित केले जाणार आहेत. बडनेरा ते अमरावती, नवसारी, कॅम्प, काँग्रेसनगर, विद्यापीठ, पंचवटी, शेगाव नाका आणि अर्जुननगर या भागांत बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.

Back to top button