दिव्यांग बांधव तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिर
महापौर श्रीचंद तेजवानी व खा.डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम

एकाच दिवसात 491 गरजूंची नोंदणी
अमरावती/3 नोव्हेंबर-अमरावती महानगरपालिका आणि कानपूर येथील ‘अलिम्को’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शहर व परिसरातील दिव्यांग बांधव तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष नोंदणी शिबिराचा उपक्रम राबवण्यात आला. रुक्मिणी नगर येथील उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 19 च्या प्रांगणात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाढत्या वयामुळे उद्भवणार्या अडचणी आणि शारीरिक अपंगत्वावर मात करत गरजू घटकांना सन्मानाने व स्वावलंबनाने जगता यावे, या सामाजिक बांधिलकीतून आयोजित या उपक्रमात एकाच दिवसात तब्बल 491 लाभार्थ्यांनी आपली नोंदणी केली. स्थानिक लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनाच्या पुढाकारातून साकारलेल्या या शिबिरामुळे अनेक वंचित व गरजू नागरिकांना शासकीय कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. दिवसभरात पार पडलेल्या नोंदणी प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘वयोश्री’ योजनेअंतर्गत 238, तर दिव्यांग व्यक्तींसाठीच्या ‘एडीआयपी’ योजनेअंतर्गत 253 लाभार्थ्यांच्या नावांची नोंद करण्यात आली. या शिबिरादरम्यान खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बलवंत वानखडे, अमरावती महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, गटनेते नाना आमले, विधी समिती सभापती स्नेहा लुल्ला आणि शिक्षण समिती सभापती एड. प्रीती रेवणे यांनी भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. महेश देशमुख, योगेश पिठे, धनंजय शिंदे आणि डॉ. प्रकाश मेश्राम यांच्यासह मनपाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले.





