दिवाळीपूर्वी ’एफडीए’ची धडक मोहीम
9 कोटींचा अन्नसाठा, पतंजलीचे तुपाचा साठाही जप्त

मुंबई / 3 नोव्हेंबर : सणासुदीत अन्नपदार्थातील भेसळ, अवैध साठवणूक व निकृष्ट खाद्यपदार्थाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धडक मोहीम राबवली. 114 आस्थापनांच्या तपासणीत 9 कोटी 1 लाखांचा 3 लाख 53 हजार 307 किलो साठा जप्त करून 19 परवाने निलंबित केले.
छत्रपती संभाजीनगर येथे 20 लाख 20 हजार 190 रुपये किमतीचे 2 हजार 289 लिटर पतंजली गायीचे तूप तर भिवंडीच्या अव्हेन्यू सुपरमार्टस (डी मार्ट) मधून 1 लाख 24 हजार 218 किलो खाद्यतेल जप्त केले. 28 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आलेल्या विशेष कारवाईत 79 लाख 40 हजार 571 रुपये किमतीचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणांत 13 गुन्हे दाखल करून 16 जणांना अटक करण्यात आली. सात आस्थापना सीलबंद केल्या. कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस-टाटा 1 एमजी मरीन कोलॅजेन पावडरच्या लेबलिंगमध्ये व जाहिराती मध्ये उल्लंघन झाल्याने टाटा हेल्थकेअर सोल्यूशन्स, एसी एफओ फार्मास्युटिकल्स, अॅमेझॉन व फ्लिपकार्टला कारणे दाखवा नोटिस पाठवण्यात आली आहे.





