20 रुपयांची बनावट नाणी चलणात; 70 कोटी खपवल्याचा दावा
आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, चौघांना अटक

नवी दिल्ली/3 नोव्हेंबर – दिल्लीपोलिसांच्या गुन्हे शाखेने 20 रुपयांची बनावट नाणी तयार करून ती बाजारात आणणार्या एका कुख्यात आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख रुपयांच्या मूळ किमतीची बनावट नाणी जप्त केली असून, मुख्य सूत्रधार उपकार लूथरासह अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. हे रॅकेट हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडपर्यंत पसरले असून, आरोपींनी आतापर्यंत 70 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बनावट नाणी बाजारात आणल्याचा खळबळजनक दावा केला आहे. 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळ पोलिसांनी एका कारमधून सुमारे 1 लाख रुपयांची बनावट नाणी जप्त केली. या कारच्या मागच्या सीटवर 50 पिशव्या सापडल्या, ज्यामध्ये प्रत्येकी 100 नाणी होती. या प्रकरणी पोलिसांनी पारस जैन या आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार उपकार लूथरा उर्फ अभय प्रताप सिंह याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला हरियाणातील सोनीपतमध्ये बनावट नाणी बनवण्याची फॅक्ट्री सुरू होती. कुणालाही शंका येऊ नये म्हणून तिथे स्क्रू ड्रायव्हर बनवण्याचा कारखाना असल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. मात्र पोलिसांना टीप लागल्याने हे युनिट उत्तर प्रदेशमधील सहारनपुरमध्ये हलवले जात होते. 13 सप्टेंबर रोजी सहारनपुर पोलिसांनी 5 जणांना अटक केली होती. आरोपींनी दिल्लीतील वेगवेगळ्या युनिट्समधून ल्युमिनियम, तांब्यापासून बनवलेल्या नाण्याच्या आकाराच्या रिंग्स आणि 20 रुपयाच्या नाण्याच्या हुबेहूब डाय मागवल्या होत्या. मशीनच्या सहाय्याने त्यावर छाप पाडून इतकी हुबेहुब फिनिशिंग केली जात होती की खरे कोणते आणि बनावट कोणते हे ओळखणे कठीण जात होते. ही फॅक्ट्री एका दिवसात 10 ते 12 हजार बनावट नाणी तयार करू शकत होती. एक नाणे बनवण्यासाठी 5 ते 6 रुपये खर्च येत होता.ही टोळी 20 रुपयांची 100 नाणी एका एका पॅकेटमध्ये भरुन पुढे पाठवत असे. 200 रुपयांच्या किमतीचे हे पॅकेट बाजारात अवघ्या 160 रुपयांना विकले जात होते.ही नाणी बाजारात खपवण्यासाठी अनेकदा अशा तरुणांचा वापर केला जात होता, ज्यांना ती खरी आहेत की खोटी हे माहितच नसायचे. मोठ्या प्रमाणात नाणी जमा झाल्यामुळे ती बँकेत वापरणे कठीण झालंय, त्यामुळे नाईलाजाने ही नाणी कमी किमतीत विकली जात आहेत, असं त्यांना सांगितले जायचे. ही बनावट नाणी टोल नाका, छोटी शहरे, वाईन शॉप्स आणि गावातील किरकोळ दुकानांवर खपवली जात होती.





