राज्यातील आपला दवाखाना, डायलिसिस सेंटर बंद

2 वर्षांच्या 1067 कोटींच्या थकबाकीमुळे आरोग्यसेवा ठप्प

मुंबई /3 नोव्हेंबर : महाराष्ट्रात विकासाच्या मोठमोठ्या घोषणा, लोकप्रिय योजनांचा गाजावाजा आणि ‘लाडकी बहीण’ सारख्या लोकानुनयी योजनांवर वर्षाला 45 हजार कोटी उधळले जात असताना दुसरीकडे राज्यातील गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याशी राज्यातील महायुती सरकार अत्यंत क्रूर खेळ करत असल्याचे चित्र समोर आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) ग्रामीण व शहरी भागात वरदान ठरलेल्या महा लॅब, मोफत डायलिसिस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ या अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य सेवा निधीअभावी आर्थिक संकटाच्या खाईत सापडली आहे. गेल्या 2 वर्षांपासून शासनाकडून ‘एचएलएल लाईफ केअर लिमिटेड’ या कंपनीची तब्बल 1,067.27 कोटी रुपयांची देयके सप्टेंबर 2026 पर्यंत प्रलंबित ठेवली आहेत. परिणामी, 1 नोव्हेंबर पासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील अनेक भागांत महा लॅब, आपला दवाखाना आणि डायलिसिस सेंटर्सच्या सेवा पूर्णपणे बंद पडल्या असून, हजारो रुग्णांना मिळणार्‍या मोफत आरोग्य सुविधांवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. एकीकडे सरकार 1 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या ‘आरोग्य संवाद यात्रे’च्या मंचावरुन आरोग्याचे गोडवे गात असताना दुसरीकडे सरकारी रुग्णालयांमध्ये रक्ताचा थेंब तपासण्यासाठी किंवा डायलिसिस करण्यासाठी गरिबांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. गरीब रुग्णांचे हाल सुरू असताना, राज्य सरकारची प्राथमिकता नेमकी कशात आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय लाभासाठी खजिना उधळायचा, पण आरोग्यासारख्या मूलभूत, अतिमहत्त्वाच्या प्राथमिक गरजेसाठी मात्र निधी द्यायचा नाही, हा राज्यकर्त्यांचा कारभार अत्यंत लाजिरवाणा आहे.

Back to top button