प्यारे खान यांना पदावरून हटविण्याची मागणी
अबू सालेमच्या भेटीवरून विश्व हिंदू परिषद आक्रमक

बजरंग दलाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
अमरावती/4 नोव्हेंबर – मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम याची अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी भेट घेतल्याच्या प्रकरणावरून अमरावतीत राजकीय वातावरण तापले आहे. या भेटीवर आक्षेप घेत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने प्यारे खान यांना अध्यक्षपदावरून तातडीने हटविण्याची मागणी केली आहे. घटनात्मक पदावर असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची भेट घेणे अयोग्य असल्याचा आरोप करीत दोन्ही संघटनांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले. तसेच या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी केली.
नागपूर येथील रहिवासी असलेले प्यारे खान यांनी अबू सालेम याची भेट घेतली आणि त्याला मदतीचे आश्वासन दिल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. घटनात्मक पदावर काम करताना अशा व्यक्तींशी संबंध ठेवणे योग्य नाही. ही बाब पदाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी असून अधिकारांचा गैरवापर असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. त्यामुळे प्यारे खान यांना पदावरून तात्काळ दूर करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विदर्भ प्रांत सहसंयोजक बंटी परवानी, अमरावती अध्यक्ष अनिल साहू, धर्मयात्रा महासंघाचे विदर्भ प्रमुख शरद अग्रवाल, बजरंग दल विभाग संयोजक सिद्धू सोळंकी, सहसंयोजक त्रिदेव डेंडवाल, अमरावती महानगर संयोजक सतीश कुरळ, गुरुदयाल सिंह बावरी, निखिल विश्वकर्मा, सत्संग प्रमुख अश्विन चौधरी, गोरक्षा प्रमुख दुर्गेश ठाकूर, बडनेरा प्रखंड संयोजक करण सोलंके, राजीव देशमुख, श्रेयस बांदाबुचे, कृष्णा काटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाईची मागणी-विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. पदाची प्रतिष्ठा जपणे आवश्यक असून, संबंधित भेटीची सखोल चौकशी करावी. प्यारे खान यांना अध्यक्षपदावरून हटवून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.





