अमरावतीत दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकेत

अप्पर वर्धा धरणात 62.88 दशलक्ष घनमीटर पाणी राखीव

उन्हाळ्यात टँकर आणि विहिरींचा आधार

अमरावती/4 नोव्हेंबर – उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आतापासूनच उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे. अप्पर वर्धा धरणातून पिण्यासाठी 62.88 दशलक्ष घनमीटर पाणी राखीव ठेवण्यात आले असले तरी सध्या 10 टक्के कपात करून अमरावती शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात पाणीसाठ्यावर अधिक ताण आल्यास दोन दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. यासाठी अतिरिक्त विहिरी, टँकर आणि पर्यायी जलस्रोतांचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीतही याबाबत चर्चा झाली. अप्पर वर्धा प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा होत असून, वाढत्या उन्हामुळे जलसाठा कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरूड, चांदूर बाजार,चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, भातकुली आणि नांदगाव खंडेश्वर येथे जून 2027 पर्यंत पाणीपुरवठा शक्य असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. मात्र, चिखलदरा येथे जानेवारी, तिवसा येथे फेब्रुवारी, धारणी येथे मार्च, तर शेंदूरजनाघाट येथे मार्च-एप्रिलमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यासाठी 31.50 कोटी रुपयांचा पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. यात 1,561 गावांसाठी 1,794 उपाययोजना प्रस्तावित आहेत. 268 गावांतील 333 कामांसाठी 4.73 कोटी, तर 504 गावांतील 550 खासगी विहिरींच्या अधिग्रहणासाठी 3.83 कोटी रुपयांची तरतूद आहे. तसेच 376 नळ पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी 17.71 कोटी रुपये आणि 270 गावांतील 392 हातपंपांच्या दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीटंचाईवर उपाययोजनांचा कृती आराखडा-जिल्ह्यातील 1,561 गावांसाठी 1,794 उपाययोजना प्रस्तावित आहेत. विहिरींचे अधिग्रहण, नळ योजनांची दुरुस्ती आणि हातपंपांची सुधारणा यासाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. गरज पडल्यास टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. या उपाययोजनांमुळे उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे.

Back to top button