भव्य विवाह रद्द, शेतकर्यांसाठी 1 कोटीची मदत
मंत्री अतुल सावे यांच्या निर्णयाची जोरदार चर्चा

छत्रपती संभाजीनगर/5 नोव्हेंबर : मराठवाड्यात पाणी टंचाई आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत समाजाप्रती आपली बांधिलकी जपत राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. आपल्या मुलाचा होणारा भव्यदिव्य विवाह सोहळा रद्द करत त्यांनी अत्यंत साधेपणाने विवाह उरकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या सोहळ्यासाठी होणारा खर्च वाचवून तब्बल 1 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द केली आहे.
येत्या 25 नोव्हेंबर रोजी मंत्री अतुल सावे यांचे चिरंजीव अनुराग आणि ईशा यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, संपूर्ण मराठवाड्यात आणि राज्यात बळीराजा तसेच सर्वसामान्य जनता भीषण दुष्काळ आणि पाणी टंचाईने होरपळत असताना भव्य उत्सव साजरा करणे मनाला पटणारे नाही, अशी भूमिका वधू आणि वर अशा दोन्ही पक्षांच्या पित्यांनी घेतली. सार्वजनिक जीवनात वावरताना लोकांच्या सुख -दुःखात खर्या अर्थाने पाठीशी उभे राहणे हीच खरी जबाबदारी असल्याचे मानत, सावे कुटुंबाने हा सोहळा केवळ अत्यंत निकटच्या कौटुंबिक वातावरणात आणि साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाचे सर्वच राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून स्वागत केले जात आहे. आपल्या या निर्णयाबाबत भावना व्यक्त करताना, राज्यातील संकटग्रस्त शेतकरी बांधव आणि गरजू कुटुंबांना या कठीण काळात आमच्या या छोट्याशा मदतीमुळे थोडा तरी दिलासा मिळावा, हाच यामागील प्रामाणिक हेतू आहे, असे सावे कुटुंबाकडून सांगण्यात आले.





