सुकामेवा, नूडल्सच्या पाकिटात हायड्रोपोनिक गांजा

पुणे विमानतळावर पावणेचार कोटींचा अमली साठा जप्त

पुणे /5 नोव्हेंबर: बँकॉकहून अन्नपदार्थांच्या पाकिटांमधून तब्बल 3 कोटी 72 लाख रुपये किमतीचा 10.642 किलो हायड्रोपोनिक गांजा पुण्यात आणण्याचा प्रयत्न कस्टम्स विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने हाणून पाडला. सुकामेवा आणि नूडल्सच्या पाकिटांमध्ये दोन पदरी काळ्या प्लास्टिकमध्ये व्हॅक्यूम सील करून हा गांजा लपविण्यात आला होता. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर 4 नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईत एका भारतीय प्रवाशाला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बँकॉकहून एअर इंडिया एक्स्प्रेसच्या (आयएक्स-291) विमानाने हा प्रवासी पुणे विमानतळावर दाखल झाला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने त्याच्या सामानाची झडती घेतली. यावेळी त्याच्या ट्रॉली बॅगेत नूडल्सची पाकिटे आणि ’फ्रीज ड्राय मंथोंग ड्युरियन’ नावाच्या सुकामेव्याची नऊ चंदेरी पाकिटे आढळली. प्रथमदर्शनी ही सामान्य खाद्यपदार्थांची पाकिटे वाटत होती. मात्र, अधिकार्‍यांनी संशयावरून बारकाईने तपासणी केली असता, पाकिटांमध्ये काळ्या प्लास्टिकचे दोन थर आणि त्यामध्ये व्हॅक्यूम सील केलेल्या पिशव्या आढळल्या. त्या उघडून पाहिल्यावर आत पिवळसर-हिरव्या रंगाच्या वाळलेल्या फुलांच्या कळ्या दिसल्या, ज्यातून उग्र वास येत होता.

Back to top button