महावितरणचा लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

50 हजारांची लाच घेतांना रंगेहाथ अटक

वाशिम/5 नोव्हेंबर ः शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराचे प्रकार सातत्याने समोर येत असतानाच आता महावितरणमधील एका लेखाधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. कंत्राटदाराचे तब्बल 1 कोटी रुपयांचे थकीत देयक मंजूर करून त्याची रक्कम काढून देण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर 65 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यापैकी 50 हजार रुपये स्वीकारताना लेखाधिकारी बबलू चवलीवार याला एसीबीच्या पथकाने सापळा रचून पकडले. या कारवाईमुळे महावितरणच्या कार्यालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणमध्ये काम करणार्‍या एका कंत्राटदाराचे सुमारे 1 कोटी रुपयांचे देयक प्रलंबित होते. संबंधित देयकाची प्रक्रिया पूर्ण करून त्याची रक्कम काढून देण्यासाठी लेखाधिकारी बबलू चवलीवार याच्याकडे कंत्राटदाराने संपर्क साधला होता. मात्र, या कामासाठी चवलीवार याने कंत्राटदाराकडे 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.कंत्राटदाराने लाचेची मागणी मान्य न करता यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने प्राथमिक पडताळणी केली. यावेळी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर तडजोडीअंती 65 हजार रुपये देण्याचे ठरल्याची माहिती समोर आली.दरम्यान, एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी संबंधित अधिकारी पुढे आला. यावेळी 65 हजार रुपयांपैकी 50 हजार रुपये स्वीकारताना बबलू चवलीवार याला पथकाने रंगेहात पकडले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे महावितरणच्या कार्यालयात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी संबंधित लेखाधिकार्‍याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लाचेची मागणी नेमकी कोणत्या प्रक्रियेसाठी करण्यात आली होती, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास एसीबीकडून केला जात आहे.
दरम्यान, राज्यात लाचखोरीच्या घटनांमधून सरकारी अधिकार्‍यांच्या बेहिशेबी मालमत्तेची प्रकरणेही समोर येत आहेत. जळगावमध्ये अवघ्या 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश मन्सुलाल शिसोदे याच्या मालमत्तेच्या तपासात तब्बल 5 कोटी 16 लाख 88 हजार 389 रुपयांची संपत्ती आढळली आहे.
रस्त्याच्या कामाचे 10 लाख रुपयांचे बिल काढून देण्यासाठी शिसोदे याने 10 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून त्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर तपासाचा भाग म्हणून त्याच्या निवासस्थानाची आणि बँकेतील लॉकरची झडती घेण्यात आली. या झडतीत मोठ्या प्रमाणावर रोकड, सोने-चांदीचे दागिने आणि स्थावर मालमत्ता समोर आली.

Back to top button