मोबाईलमध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफीचे 20 हजारांवर फोटो,मालाडमधून 49 वर्षीय व्यक्तीला अटक

मुंबई/7 नोव्हेंबर ः महाराष्ट्र सायबर सेलने एका 49 वर्षीय व्यक्तीला मोबाईल फोनमध्ये बाल लैंगिक शोषणाची 20 हजारांहून अधिक फोटो आणि व्हिडिओ बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपीची ओळख मालाड पश्चिम येथील रहिवासी सैफुद्दीन जमीरउद्दीन मलिक अशी आहे. त्याच्या मोबाईल फोनमध्ये मोठ्या प्रमाणात बाल लैंगिक शोषणाचे साहित्य सापडल्याने तपास अधिकारी आश्चर्यचकित झाले.महाराष्ट्र सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार, सतत इंटरनेट पाळत आणि तांत्रिक गुप्त माहिती गोळा करत असताना त्यांच्या पथकाला एका अशा व्यक्तीबद्दल माहिती मिळाली, जो आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बाल लैंगिक शोषणाची फोटो आणि व्हिडिओ डाउनलोड करून साठवत होता. आधुनिक सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या सखोल तपासामुळे संशयिताची ओळख सैफुद्दीन जमीरउद्दीन मलिक अशी पटली. आरोपांची पुष्टी झाल्यानंतर महाराष्ट्र सायबर सेलने मुख्य सायबर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 214, पॉक्सो कायद्याच्या कलम 15 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर, पोलीस पथकाने मालाड पश्चिम येथील त्याच्या निवासस्थानी छापा टाकून त्याला अटक केली. प्राथमिक तपासात आरोपीच्या मोबाईल फोनमध्ये बाल लैंगिक शोषण आणि पिळवणूक दर्शवणारे 20 हजारांहून अधिक फोटो आणि व्हिडिओ आढळून आले. पोलीस आता या डिजिटल फाईल्सचे फॉरेन्सिक विश्लेषण करत आहेत. आरोपीला एवढ्या मोठ्या प्रमाणात सामग्री कशी मिळाली? तसेच, त्याने ती कोणत्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड केली? हे निश्चित करणे हा तपासाचा मुख्य उद्देश आहे. आरोपीने हे फोटो आणि व्हिडिओ इतर कोणासोबत शेअर केले होते का? याचाही पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात इतर व्यक्तींच्या सहभागाची शक्यताही तपासात विचारात घेतली जात आहे.
ऑनलाइन बाल लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलने 3 विशेष युनिट्स तयार केली आहेत. महिला आणि मुलांवरील सायबर गुन्हे प्रतिबंध, ऑनलाइन गुन्ह्यांचा तपास आणि बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र सायबर सेलच्या माहितीनुसार, या विशेष पथकांनी आतापर्यंत ऑनलाइन बाल लैंगिक शोषणाशी संबंधित 5 लाख 67 हजारांहून अधिक सायबर टिपलाइन अहवाल आणि 31 हजार तक्रारींवर यशस्वीपणे कारवाई केली आहे.

Back to top button