चिंता करू नका, सरकार तुमच्या पाठीशी
मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

लोहारी सावंग्यात दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या घरी दिवाळी
नागपूर/7 नोव्हेंबर: पावसाने पाठ फिरविली, शेतातील उभी पिके करपली, विहिरींची पातळी खालावली आणि चारा-पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला. निसर्गाच्या या संकटाने शेतकरी हवालदिल झाला असला, तरी त्याने स्वतःला एकटे समजू नये. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आर्थिक मदतीपासून वीजबिल माफीपर्यंत निर्णय घेतले असून, आगामी काळात जलसंधारणाची व्यापक कामे आणि नव्या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाला दिलासा दिला जाईल. या अस्मानी संकटाचा सामना आपण सर्वांनी एकजुटीने करायचा आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना दिला. लोहारी सावंगा येथील ग्रामपंचायत परिसरातील सभामंडपात गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सरपंच विपीन चापले यांच्या घरी ग्रामस्थांशी संवाद साधला. यंदाचे वर्ष आव्हानांचे असल्याचे सांगताना ते म्हणाले, पावसाने शेवटपर्यंत दडी दिल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. राज्यातील काही भागांत चारा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कठीण परिस्थितीत शेतकर्यांना सावरण्यासाठी सरकारने मदतीचे निर्णय घेतले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, काटोलचे आ. चरणसिंग ठाकूर, सावनेरचे आ. आशिष देशमुख, आ. डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सरकारने यापूर्वी कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतला. लाखो शेतकर्यांना त्याचा लाभ मिळाल्याने त्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली. मात्र, दुष्काळामुळे त्यांच्यासमोर पुन्हा आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिवाळी साजरी करता यावी, यासाठी सुमारे दीड कोटी शेतकर्यांच्या खात्यांत प्रत्येकी पाच हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. ही प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय शेतकर्यांचे वीजबिल आणि त्यावरील थकबाकीही माफ करण्यात आली आहे.
गोकुळवर ताबा मिळवायचा हेतू नाही
नागपूर : ‘गोकुळ’दूध संघावर मागच्या दाराने कब्जा करण्यासाठी महायुती सरकारने सहकार कायद्यात दुरुस्तीचा अध्यादेश काढल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज्य सरकारने तडकाफडकी सहकार कायद्यात सुधारणा करून गोकुळवर 5 शासन नामनिर्देशित (स्वीकृत) संचालक नेमण्याचा आणि त्यातील 4 जणांना मतदानाचा अधिकार देण्याचा अध्यादेश जारी केला आहे, ज्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मंजुरी दिली आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात गोकुळवर ताब्याची भावना चुकीची असून वैधानिक पेच निर्माण झाल्याने घेतलेला निर्णय असल्याचे सांगितले.