पुढील वर्षी नरकासूर दहन, मंत्री म्हणूनच करणार – आ. रवी राणा
वरिष्ठ नेत्यांचा शब्द बडनेरा मतदारसंघाला मोठा न्याय

अमरावती/9 नोव्हेंबर – संकट काळात जनतेच्या पाठीशी उभे राहून दिवाळीचा सण गोड केल्यानंतर आता वरिष्ठ नेतृत्वाने दिलेल्या शब्दावर आगामी काळात राज्याच्या मंत्रिमंडळात शपथ घेऊन बडनेरा मतदारसंघासह संपूर्ण अमरावती जिल्ह्याला विकासाचा मोठा न्याय मिळवून देणार असून पुढच्या वर्षीचे नरकासूर दहन थेट मंत्री म्हणूनच करणार असल्याचा आक्रमक आणि खणखणीत निर्धार आ. रवी राणा यांनी व्यक्त केला.
दिवाळीच्या पावन पर्वावर आयोजित स्नेहमेळाव्यात आ. रवी राणा यांनी थेट सत्तेच्या चाव्या हाती घेण्याचे संकेत देत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली. जनसेवेची ताकद ही केवळ मतांपुरती नसून ती सामान्य माणसाचे जीवन उजळण्यासाठी असते. निवडणुकीच्या राजकारणापलीकडे जाऊन प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात हक्काने धावून जाणारा भाऊ म्हणून जबाबदारी पार पाडत आलो आहे. वरिष्ठ नेत्यांनी दिलेला शब्द हा जनतेच्या घामाचा आणि विश्वासाचा सन्मान असून येणार्या काळात मंत्रिपदाची शपथ घेऊन बडनेरा मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढू.
या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी केलेल्या सत्काराचा नम्रपणे स्वीकार करण्यात आला. या प्रसंगी जयंतराव, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बडनेरा परिसराच्या विकासाचा रथ आता अधिक वेगाने पुढे नेणार असल्याचे आ. रवी राणा यांनी स्पष्ट केले. उपस्थितांनी दिलेल्या प्रचंड पाठिंब्याच्या जोरावर संपूर्ण परिसर श्रीरामचंद्रांच्या जयघोषाने दणाणून गेला होता.
गरिबीचे चटके आणि समाजकार्याची खरी शिकवण
स्वतः गरिबीचे चटके अनुभवल्याने दिवाळीच्या सणाला प्रत्येक गरिबाच्या घरात किराणा आणि माता-भगिनींना साडी पोहोचवली. गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये हाच विचार आयुष्यभर जपला. माणूस किती जगला यापेक्षा किती लोकांसाठी जगला यालाच खरे मोल असून अखेरपर्यंत हीच जनसेवा अखंड चालू राहील.





