दिवाळीच्या सुट्टीत घरफोड्यांचा धोका वाढला
सामाजिक माध्यमांवरील प्रवासाचे संदेश चोरांसाठी ठरू शकतात उपयोगी

गावी जाताना घराच्या सुरक्षेची काळजी घ्या
अमरावती/6 नोव्हेंबर – दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक कुटुंबे गावाकडे किंवा बाहेरगावी फिरायला जात असल्याने बंद घरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक दिवस घराला कुलूप लावून बाहेर जाताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. घराबाहेर लपवून ठेवलेल्या अतिरिक्त चाव्या, दरवाजाजवळ ठेवलेल्या वस्तू आणि सामाजिक माध्यमांवर टाकले जाणारे प्रवासाचे संदेश यामुळे चोरट्यांना घरात शिरण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासह मजबूत कुलूप, सुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही आणि शेजार्यांची मदत घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दिवाळीच्या काळात अनेक जण कुटुंबासह काही दिवसांसाठी गावाला जातात. याच संधीचा फायदा घेत चोरटे बंद घरांवर लक्ष ठेवतात. घराला कुलूप असल्याचे पाहून घरफोडीचा प्रयत्न होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे काही नागरिक घराची अतिरिक्त चावी दरवाजाच्या हाताळण्याजवळ, जुन्या डब्यात, बुटांमध्ये किंवा पायपुसणीखाली ठेवतात. मात्र चोरटे अशा ठिकाणांची आधीच तपासणी करतात. त्यामुळे चावी विश्वासू व्यक्तीकडे किंवा शेजार्यांकडे सुरक्षित ठेवणे अधिक योग्य ठरते. अनेक जण घराबाहेर पडताच सामाजिक माध्यमांवर ’गावी जात आहे’, ’सुट्टीसाठी बाहेर’ अशा संदेशांसह छायाचित्रे टाकतात. काही जण प्रवासाचे ठिकाण आणि परतण्याची तारीखही जाहीर करतात. अशा माहितीमुळे घर किती दिवस बंद राहणार, याचा अंदाज चोरट्यांना सहज येऊ शकतो. त्यामुळे प्रवास पूर्ण होईपर्यंत असे संदेश टाकणे टाळावे. गावी जाण्यापूर्वी घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित बंद कराव्यात. सोने-चांदीचे दागिने व रोकड बँकेच्या तिजोरीत ठेवावी. घराला चांगल्या दर्जाचे कुलूप लावावे. शक्य असल्यास सुरक्षा गजर यंत्रणा आणि सीसीटीव्ही बसवून ती सुरू असल्याची खात्री करावी. विश्वासू शेजार्याला घर बंद असल्याची माहिती द्यावी. जास्त दिवस बाहेर राहणार असल्यास स्थानिक पोलिसांनाही कळवावे.
घर आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रण नियमित तपासणेही महत्त्वाचे आहे. मजबूत दरवाजे, चांगली कुलूप व्यवस्था आणि वैयक्तिक सतर्कता यामुळे चोरीच्या घटना टाळण्यास मदत होऊ शकते. दिवाळीच्या काळात पोलिसांकडून 24 तास गस्त घातली जात असून नागरिकांनीही सतर्क राहावे, असे आवाहन नांदगाव पेठचे ठाणेदार सतीश पाटील यांनी केले आहे.