रेल्वे प्रवासात फटाके, पेट्रोल नेल्यास तुरुंगवास
ज्वलनशील वस्तू बाळगल्यास 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद

स्थानकांसह धावत्या रेल्वेतही विशेष तपासणी मोहीम
अमरावती /8 नोव्हेंबर– रेल्वे प्रवासात दिवाळीचे फटाके, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, रॉकेल किंवा अन्य स्फोटक व ज्वलनशील पदार्थ सोबत नेणे प्रवाशांना चांगलेच महागात पडू शकते. अशा वस्तू बाळगणे रेल्वे कायद्यानुसार गुन्हा असून, दोषी आढळल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. सणासुदीच्या काळात अशा वस्तूंमुळे रेल्वेतील शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे भुसावळ मध्य रेल्वे विभागाने स्थानके आणि धावत्या रेल्वेत विशेष तपासणी मोहीम सुरू केली असून, संशयास्पद वस्तू आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
दिवाळीच्या काळात अनेक प्रवासी नकळत किंवा निष्काळजीपणामुळे फटाके, वाहनांसाठी पेट्रोल-डिझेल, रॉकेल तसेच गॅस सिलिंडर यांसारख्या वस्तू सामानात ठेवून रेल्वेने प्रवास करतात. मात्र, अशा वस्तूंमुळे आग लागण्याचा किंवा मोठा स्फोट होण्याचा धोका असतो. त्यामुळे संबंधित प्रवाशासोबतच डब्यातून प्रवास करणार्या इतर प्रवाशांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तपासणी आणि जनजागृतीला वेग दिला आहे. रेल्वे कायद्याच्या कलम 164 नुसार प्रतिबंधित स्फोटक, ज्वलनशील किंवा धोकादायक वस्तू सोबत घेऊन प्रवास करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाते. यामध्ये 3 वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. त्यामुळे प्रवाशांनी अशा वस्तू सामानात ठेवणे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या मोहिमेत रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस आणि वाणिज्य विभागाचे कर्मचारी स्थानकांवर तसेच धावत्या रेल्वेत प्रवाशांच्या सामानाची अचानक तपासणी करत आहेत. यासोबतच फलक, फलकपत्रे आणि स्थानकांवरील उद्घोषणांच्या माध्यमातून प्रवाशांना धोकादायक वस्तूंच्या वाहतुकीबाबत माहिती दिली जात आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी चेतन फडणीस यांनी प्रवाशांना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सहप्रवाशाच्या सामानात स्फोटक किंवा ज्वलनशील वस्तू असल्याचा संशय आल्यास तातडीने रेल्वे कर्मचार्यांना माहिती द्यावी किंवा रेल्वेच्या 130 या अधिकृत मदत क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.





