कर्जाच्या ओझ्याने दोन शेतकर्‍यांची आत्महत्या

मालटपुरातील 58 वर्षीय महिला शेतकर्‍याने घेतला गळफास

* तळेगाव दशासरच्या 45 वर्षीय शेतकर्‍याची विष प्राशनाने मृत्यू

अमरावती/7 नोव्हेंबर – जिल्ह्यात कर्जबाजारीपणा आणि शेतीतील नुकसान यामुळे दोन शेतकर्‍यांनी जीवन संपविल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मालटपुरा येथील 58 वर्षीय महिला शेतकरी यमुना लक्ष्मण सायम यांनी कर्जाच्या चिंतेतून गळफास घेतला, तर तेलगाव दशासर येथील 45 वर्षीय शेतकरी सचिन अण्णाजी रामटेके यांनी पिकांचे नुकसान आणि कर्जाच्या ओझ्यामुळे विष प्राशन केले. या दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकर्‍यांच्या आर्थिक संकटाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मालटपुरा येथे राहणार्‍या यमुना लक्ष्मण सायम (58) या कर्जामुळे चिंतेत होत्या. 26 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे 9 वाजता त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. दुसरी घटना तेलगाव दशासर येथे घडली. येथील शेतकरी सचिन अण्णाजी रामटेके (45) यांचे पिकांचे नुकसान झाले होते. त्यातच डोक्यावरील कर्जाचा भार वाढल्याने त्यांनी विष प्राशन केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने शेतीसमोरील संकटाची गंभीरता वाढली आहे. पिकांचे नुकसान, घटते उत्पन्न आणि कर्जफेडीची चिंता यामुळे शेतकरी कुटुंबे अडचणीत सापडत आहेत. शेतकर्‍यांना वेळेवर आर्थिक मदत आणि योग्य आधार मिळण्याची गरज या घटनांनी पुन्हा अधोरेखित केली आहे.

Back to top button