अमरावतीचा चित्रपटसृष्टीत मोठा ठसा

अशोक खरात प्रकरणावर मराठी चित्रपटाची निर्मिती

आनंदी पिक्चर्सचा सादरीकरणात महत्त्वाचा सहभाग

अमरावती/9 नोव्हेंबर – नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा मराठी चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या सादरीकरणात अमरावतीच्या आनंदी पिक्चर्स आणि सचिन रोडे पाटील यांचा सहभाग असल्याने स्थानिक चित्रपट क्षेत्रात उत्सुकता वाढली आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी अशोक खरात यांची भूमिका साकारणार असून, सुबोध भावे महत्त्वाच्या राजकीय भूमिकेत दिसणार आहेत.
मातोश्री एंटरटेनमेंट वर्ल्डच्या माध्यमातून चित्रपटाची निर्मिती झाली आहे. देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यासह उदय टिकेकर, अक्षय टंकसाळे, माधुरी पवार आणि भारत गणेशपुरे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. स्वरूप सावंत यांनी दिग्दर्शन केले असून, सागरकुमार एस. जैन यांच्या मूळ संकल्पनेवर कथा, पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. श्रद्धेच्या नावाखाली महिलांचे कथित शोषण, आर्थिक व्यवहार आणि राजकीय संबंध यांसारख्या विषयांवर चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे.
चित्रपटाच्या ध्वनि चित्रफितीला प्रेक्षकांकडून उत्सुकता दाखवली जात असून, प्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावतीच्या सहभागाची राज्यभर चर्चा-आनंदी पिक्चर्सच्या सहभागामुळे अमरावतीचे नाव मराठी चित्रपट क्षेत्रात पुढे आले आहे. स्थानिक निर्मात्यांना राज्यस्तरावर ओळख मिळण्याची संधी या चित्रपटामुळे निर्माण झाली आहे. 20 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार्‍या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याची उत्सुकता आहे.

Back to top button