दादांच्या विमान अपघातात सुनील तटकरेंचा हात?
चौकशी करण्याची रामदास कदम यांची मागणी

मुंबई/9 नोव्हेंबर : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र दिसल्या असत्या, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तीन दिवसांपूर्वीच केले. तटकरे यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सध्या चर्चा होताना दिसत आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सुनील तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांच्या विरोधात काम केले आणि पोयनाळ धरणाचे काम रखडल्यामुळे 14 गावांतील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. या दोन्ही गोष्टींसाठी सुनील तटकरेच जबाबदार आहेत, असे आरोप रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषदेत केले. मात्र त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला. रामदास कदम म्हणाले की, सुनील तटकरे तुम्ही अंतुले साहेबांचे पीए होतात आणि अंतुले साहेबांना संपायचं पाप तुम्हीच केलं. आता काल मी जी बातमी ऐकली, एक आमदार सांगतोय की, अजितदादा गेल्यानंतर सुनील तटकरेंना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं आणि म्हणून ते सगळ्या आमदारांना फोन लावून हॉटेलमध्ये बोलतवत होते. याचा अर्थ काय होतो? अजितदादांच्या मरणाची तुम्ही वाट पाहत होतात का? अजितदादांच्या घातपदामध्ये तुमचा काही वाटा आहे का? असा संशय निर्माण होतो. म्हणून माझी शासनाकडे मागणी आहे की, अजितदादांचा घातपात झालाय का? आणि त्याबाबत सुनील तटकरेंची चौकशी व्हावी. कारण तटकरे राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेले आहेत. रामदास कदम म्हणाले की, सुनील तटकरेंना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. त्यामुळे माझी मागणी आहे की, सुनील तटकरेंची चौकशी झाली पाहिजे. अजितदादांचा जो घातपात किंवा अपघात झालाय त्याच्यामध्ये यांचा काय सहभाग आहे का? याची चौकशी व्हावी. माझ्या मनामध्ये संशय आहे म्हणून चौकशी व्हावी असं माझं म्हणण आहे, अशी भूमिका रामदास कदम यांनी मांडली. दरम्यान, रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे महायुतीतील घटक पक्ष आहेत.





