सालोरा मार्गावर एसटी बस उलटली; 20 प्रवासी जखमी

ब्रेक निकामी झाल्याने घडला अपघात

सामाजिक कार्यकर्त्यांची घटनास्थळी धाव

अमरावती/10 नोव्हेंबर – धामणगाव-सालोरा मार्गावर मंगळवारी दुपारी एसटी बस उलटून झालेल्या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. तिवसा येथील आ. राजेश वानखडे यांच्या पत्नी आरती वानखडे यांनीही घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात पाठविण्यासाठी मदत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस क्रमांक एमएच-40/वाय-5183 ही शिरजगाव मोझरी येथून अमरावतीच्या दिशेने येत होती. धामणगाव-सालोरा मार्गावरील नाल्याजवळ बसचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर उलटली. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले. बसचालक आणि वाहकालाही किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर गावकर्‍यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सर्वांना अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांच्या पथकाने तातडीने उपचार सुरू केले. दरम्यान, या अपघातामुळे धामणगाव-सालोरा मार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा रस्ता अरुंद असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. या मार्गाच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीसाठी शिरजगाव मोझरी येथील युवक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी यापूर्वी 5 दिवस उपोषण केले होते. मात्र, प्रशासनाकडून ठोस काम झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

लेखी आश्वासनानंतरही रस्त्याचे काम रखडले
मोझरी-जळका शहापूर मार्गाच्या दुरवस्थेविरोधात प्रशांत कांबळे, पुरुषोत्तम मेश्राम आणि चंदू वानखडे यांनी आंदोलन केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने 2 महिन्यांत रस्त्याचे नूतनीकरण, खड्डे बुजविणे, कडेने दिशादर्शक पट्ट्या लावणे आणि झाडे हटविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, 8 महिने उलटूनही काम सुरू झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

Back to top button