सोनिया गांधींनी पंतप्रधानपद का नाकारले?
कुटुंबातूनच कुणी वाजवली नकारघंटा

आत्मचरित्रातून अनेक गौप्यस्फोट
विविध राजकीय घटनांचाही उल्लेख
नवी दिल्ली/10 नोव्हेंबर : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारण्याचा निर्णय अचानक घेतलेला नव्हता. त्यांची स्वतःची मते, कौटुंबिक चिंता, सुरक्षेची चिंता आणि देशाच्या राजकीय परिस्थितीची त्यांची समज ही त्यामागील कारणे होती. त्यांच्या आगामी ‘बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात, सोनिया गांधींनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित आघाडीच्या विजयानंतर पंतप्रधान होण्याची मागणी का झाली, त्या घटनेचा तपशील दिला आहे. त्यांचा मुलगा राहुल गांधी आणि मुलगी प्रियंका गांधी यांनाही त्या पंतप्रधान व्हाव्यात, असे वाटत नव्हते. त्यांच्या आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांच्या हत्यांच्या वेदनादायक आठवणी दोघांच्याही मनात होत्या. पंतप्रधानपद स्वीकारल्यास आईबाबतही असेच होईल, याची त्यांनी भीती वाटत होती. सोनिया गांधी यांनी हे देखील सांगितले आहे की, आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान होण्यासाठी त्यांच्यावर कसा दबाव टाकला आणि अखेरीस त्यांनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार ते पद नाकारण्याचा निर्णय कसा घेतला. हे आत्मचरित्र हार्परकॉलिन्स इंडियाने प्रकाशित केले आहे. इंडियन एक्स्प्रेसने सोनिया गांधींच्या पुस्तकातील एक विशेष उतारा प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधानपद न स्वीकारण्याच्या आपल्या निर्णयामागील संपूर्ण कहाणी सांगितली आहे.
सोनिया गांधी लिहितात की, लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी निवडणुका जिंकल्यास आपण पंतप्रधानपद स्वीकारणार का, यावर त्यांनी त्यांच्या मुलांशी चर्चा केली होती. त्यांच्या दोन अपत्यांपैकी एकाने प्रश्न थेट विचारला. सोनिया गांधींनी जवळजवळ रागानेच, स्पष्टपणे उत्तर दिले, मुळीच नाही! तथापि, मुलांनी त्यांना पुन्हा विचारले की त्या आपल्या निर्णयाबद्दल ठाम आहात का? त्यांनीही होय म्हटले. पंतप्रधान बनण्याचा त्यांचा अजिबात हेतू नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. सोनिया गांधींच्या मते, राहुल आणि प्रियांका गांधी या दोघांनाही त्या पंतप्रधान व्हाव्यात असे वाटत नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या कुटुंबातील दोन मोठ्या राजकीय हत्यांचा धक्कादायक अनुभव होता. त्या दोघांनीही त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्या हत्येचा मानसिक आघात सहन केला होता आणि नंतर एका निर्घृण हत्येत त्यांनी त्यांचे वडील राजीव गांधी यांना गमावले. परिणामी, पंतप्रधानपदाला असलेला धोका त्यांच्या मनात नेहमीच घर करून होता. सोनिया गांधी लिहितात की, जेव्हा त्यांनी या विषयावरची त्यांची मते पहिल्यांदा मुलांसमोर मांडली, तेव्हा त्यांना खूप बरे वाटले. त्यानंतर त्यांनी या विषयावर कुणाशीही चर्चा केली नाही.
सोनिया गांधींच्या मते, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जेव्हा जेव्हा त्यांना जाहीरपणे विचारले गेले की त्या पंतप्रधान होणार का, तेव्हा त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. त्यावेळी, काँग्रेससमोर निवडणूक जिंकण्याचे, तसेच आपले राजकीय स्थान टिकवून ठेवण्याचे आणि पक्षाला एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान होते. पंतप्रधानपदावरून पक्षात कोणतीही अंतर्गत कलह होऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या मते, काँग्रेस नेत्यांमध्ये नेतृत्वावरून वाद निर्माण होऊ देणे हे त्यावेळी पक्षाच्या हिताचे नव्हते. त्यामुळे, त्यांनी त्याचे विचार स्वतःपुरतेच ठेवले. त्यांनी ही गोष्ट आपल्या जवळच्या राजकीय सहकार्यांशीही शेअर केली नाही. सोनिया गांधींचा असा विश्वास होता की, देशातील पूर्वीच्या काँग्रेस सरकारांचा वारसा पुढे नेण्यासाठी, पंतप्रधान अशी व्यक्ती असावी जिला शासनाचा दांडगा अनुभव असेल आणि जिच्या सचोटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही.
सोनिया गांधींनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना त्यांचे पती राजीव गांधी आणि सासू इंदिरा गांधी यांच्याप्रती जबाबदारीची भावना जाणवली. ज्या मूल्यांसाठी आणि उद्दिष्टांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला होता, ती पुढे नेणे हे कर्तव्य मानले. मात्र, पंतप्रधानपदाबाबतची परिस्थिती वेगळी होती. आता, ही जबाबदारी स्वीकारावी की नाही, याचे उत्तर त्यांना स्वतःमध्येच शोधावे लागणार होते. एकीकडे, पंतप्रधान होण्याची कल्पना त्यांच्या मनाने पूर्णपणे नाकारली होती, तर दुसरीकडे, पक्षाचे कार्यकर्ते आणि ज्यांनी काँग्रेस व तिच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून त्यांना मतदान केले होते, त्यांच्याप्रती असलेली जबाबदारीची भावना त्यांना सतावत होती. पंतप्रधान होण्यास नकार दिल्यास पक्षाचे कार्यकर्ते निराश होतील, याचीही त्यांना चिंता होती. सोनिया लिहितात की, त्या काळात त्यांच्या भावना सतत बदलत होत्या. कधी वाटायचे निर्णय अगदी योग्य आहे, तर कधी गोंधळून जायला व्हायचे.
दरम्यान, आघाडीच्या नेत्यांसोबत एक बैठक ठरली होती. ही बैठक सोनिया गांधींच्या घरी होती. आघाडीच्या नेत्यांनी सोनिया गांधींना पंतप्रधान होण्यासाठी राजी करण्याचे आश्वासन त्यांच्या सहकार्यांना दिले होते. सोनिया गांधींनी त्यांच्या पुस्तकात या संपूर्ण घटनेचे तपशीलवार वर्णन केले आहे.





