मंदिर विश्वस्तांची राज्यस्तरीय परिषद अमरावतीत
5 डिसेंबरला संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजन

मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण, पालकमंत्री बावनकुळे उपस्थित राहणार
अमरावती/10 नोव्हेंबर – राज्यातील मंदिर संस्थानांचा कारभार अधिक पारदर्शक आणि नियमबद्ध व्हावा, विश्वस्तांना कायदेशीर व प्रशासकीय कामकाजाची माहिती मिळावी, तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन आणि धर्मादाय प्रशासन यांच्यात समन्वय वाढावा, या उद्देशाने 5 डिसेंबरला अमरावतीत राज्यस्तरीय विश्वस्त महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र देवस्थान समिती आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात ही परिषद होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले असून, त्यांच्या उपस्थितीची शक्यता आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या परिषदेला राज्यातील विविध जिल्ह्यांतील मंदिर संस्थानांचे अध्यक्ष, विश्वस्त, पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मुंबईचे धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, धर्मादाय आयुक्त खोचे आणि विभागातील वरिष्ठ अधिकारी विश्वस्तांना मार्गदर्शन करणार आहेत. मंदिरांच्या आर्थिक व्यवहारांतील पारदर्शकता, कायदेशीर नियम, प्रशासकीय कामकाज आणि संस्थानांच्या विकासासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. मंदिर विश्वस्तांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधणे, तसेच शासन आणि मंदिर संस्थानांमध्ये समन्वय वाढविणे हा परिषदेचा मुख्य हेतू आहे. या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन नीलेश तवलारे, कैलासकुमार पनपालिया, आशीष मारोडकर, कैलास गिरोलकर, धनराज वेलणकर, ओमप्रकाश परतानी, श्रीकृष्ण माहोरे, अक्षय पुंडेकर, विजय करडे, मोहन इंगळे, रवींद्र भोयर आणि रोहन ढोमणे यांनी केले आहे.
मंदिरांच्या कारभाराला मिळणार नवी दिशा
राज्यातील मंदिर संस्थानांना अनेकदा आर्थिक, कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागतो. या परिषदेत वरिष्ठ अधिकार्यांकडून थेट मार्गदर्शन मिळणार असल्याने विश्वस्तांना कामकाजातील नियम समजण्यास मदत होईल. मंदिरांचा विकास, भाविकांना सुविधा आणि कारभारातील पारदर्शकता वाढविण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे.