वाढदिवसानिमित्त आ.प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मित्रमंडळाचा पुढाकार

अमरावती/10 नोव्हेंबर : एल निनोचा संभाव्य प्रभाव आणि सरासरीपेक्षा कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे राज्यातील शेतकरी अडचणींचा सामना करत आहेत. या बिकट परिस्थितीची जाणीव ठेवून आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच उपक्रमांतर्गत राठीनगर व संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते पिंपळाच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मित्रमंडळ, आमदार प्रवीण पोटे पाटील मित्रमंडळ आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दीर्घायुष्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पिंपळवृक्षाचे रोपण करून वाढदिवसाच्या निमित्ताने निसर्ग संवर्धनाचा एक विधायक संदेश समाजाला देण्यात आला. या प्रसंगी बोलताना आमदार प्रवीण पोटे पाटील म्हणाले, झाडे आहेत म्हणूनच निसर्ग आहे. परिस्थिती लक्षात घेता जल, जंगल आणि जमीन यांचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून काळाची गरज बनली आहे. केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन आणि संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मित्रमंडळाचे रविभाऊ चौधरी, दिलीपभाऊ निंभोरकर, सुधाकर तपासे, विनायकराव ठाकरे, नरेंद्र देशमुख, विनायक साबळे, श्रीप्रकाश त्रिपाठी, अमोल तायडे, हिरालाल सूर्यवंशी, विजय महल्ले, मधुकर पोटे, नरेंद्र सपकळ, शाम केचे, गोपाळराव गावंडे, संजय मोरय्या, प्रदीप चौधरी, गजानन ठाकरे, डॉ. सोनवणे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





