दोन दुचाकींच्या धडकेत दोघे जागीच ठार
आष्टी येथील दुर्घटना

गडचिरोली /10 नोव्हेंबर: गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी -चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील एका पेट्रोल पंपासमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पोस्टमनसह दोघे जण जागीच ठार, तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी, 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता घडली. ट्रक चालकाने अचानक घेतलेल्या वळणामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. राजू येलमुले (53, रा. अनखोडा ता. चामोर्शी), श्याम बिस्वास (42, रा. रवींद्रपूर ता. चामोर्शी) अशी मृतांची नावे आहेत. तर, संदीप राजू येलमुले (20, रा. अनखोडा) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.अनखोडा येथील राजू येलमुले हे पेशाने पोस्टमन होते. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ते आपला मुलगा संदीप येलमुले याच्यासह एमएच- 33/ झेड-6451 क्रमांकाच्या दुचाकीने अनखोडा येथून आष्टी येथील पोस्ट ऑफिस कार्यालयात येत होते. दरम्यान, आष्टी येथील पेट्रोल पंपसमोर विरुद्ध दिशेने येणार्या श्याम बिस्वास याच्या एमएच- 33/ एबी-5898 क्रमांकाच्या दुचाकीशी त्यांची समोरासमोर जोरदार धडक बसली. मृत श्याम बिस्वास हा मजुरीकाम करायचा, तो वैयक्तिक कामानिमित्त आष्टीत आला होता. दरम्यान, त्याच्या दुचाकीसमोर एमएच-33/ टी-8903 क्रमांकाचा ट्रक जात होता. या ट्रक चालकाने पेट्रोल पंपच्या बाजूला अचानक वळण घेतल्यामुळे श्याम बिस्वास याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.





