हायड्रो प्रकल्प राज्यासाठी वरदान
टीका करणार्यांवर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

नागपूर /7 नोव्हेंबर: अभिनेते आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत-भीमाशंकर परिसरातील टोरंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित 3,000 मेगावॅट क्षमतेच्या पंप स्टोरेज जलविद्युत (हायड्रो) प्रकल्पासाठी होणार्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवला आहे. राज्यातील अनेक पर्यावरणवाद्यांनीही विरोध केला आहे. परंतु सरकारकडून या प्रकल्पाचे समर्थन केले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकल्पासाठी वृक्षतोडीला विरोध करणार्या सयाजी शिंदे यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, हायड्रो प्रकल्प राज्यासाठी वरदान ठरतात. अशा प्रकल्पांमुळे स्वस्त वीज उपलब्ध होते. शेतकर्यांना दिवसा वीज देण्याच्या दृष्टीनेही हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. सयाजी शिंदे यांचे म्हणणे आम्ही ऐकून घेऊ. किती झाडे लावायची, यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याचीही आमची तयारी आहे. झाडे तोडणे योग्य नाही; मात्र हायड्रो प्रकल्पही परत जाणे योग्य नाही. पर्यावरणाचा समतोल राखत विकासाचे प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकर्यांना मिळणार फार्मर आयडी
राज्यातील शेतकर्यांना मोठा दिलासा देणारे दोन महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. 1 जानेवारी 2015 पूर्वी शेतजमीन कसत असल्याचा कोणताही एक पुरावा उपलब्ध असलेल्या शेतकर्यांना फार्मर आयडी देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 1 लाख 60 हजार शेतकर्यांना लाभ मिळणार असून, दिवाळीच्या निमित्ताने सरकारने शेतकर्यांना ही मोठी भेट दिली आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.





