देशात अराजकता निर्माण करण्यासाठी काँग्रेसला विदेशी फंडिंग
भाजपचे प्रेम शुक्ला यांचा काँग्रेसवर वार

नागपूर/2 नोव्हेंबर : विदेशी फंडिंग आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सातत्याने होत असलेल्या पराभवाच्या हताशेतून काँग्रेस आणि विरोधकांकडून अशा शक्तींना बळ दिले जात असून, लोकशाही वाचविण्याच्या नावाखाली संविधानविरोधी तत्त्वांना एकत्र आणले जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी केला. नागपूर येथे सोमवारी, 2 नोव्हेंबर रोजी ते पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते.
राहुल गांधी आणि काँग्रेसकडून एसआयआरच्या मुद्द्यावरून देशात संभ्रम निर्माण केला जात आहे. मतदार यादीच्या शुद्धीकरणाला विरोध करून अराजकवादी तत्त्वांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. रामलीला मैदानावर राहुल गांधींच्या नेतृत्वातील सभा हा ‘फ्लॉप शो’ ठरला. सभेला 10 लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात केवळ 25 हजार लोक उपस्थित होते. 13 कोटी मतदारांची नावे वगळल्याचा दावा खरा असता, तर किमान लाखभर लोक तरी मैदानात आले असते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 56 निवडणुकांमध्ये पराभव पत्करला आहे. एसआयआर नसतानाही काँग्रेसला 100 जागांचा टप्पा गाठता आला नाही. निवडणुकांनंतर राबविण्यात येत असलेल्या एसआयआरवर पराभवाचे खापर फोडणे चुकीचे आहे असे शुक्ला म्हणाले. काँग्रेसच्या राजकीय घसरणीचा उल्लेख करताना त्यांनी 2004 ते 2026 या काळातील भाजप आणि काँग्रेसच्या आमदारसंख्येची आकडेवारी मांडली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसचे राजकीय पतन झाले, असा आरोप त्यांनी केला. डॉ. नितीश सिंग, पवन तिवारी, कल्पना नळसकर, वैभव बावनकर प्रामुख्याने उपस्थित होते.
काँग्रेसच्या शासनकाळात 10 वेळा एसआयआर
देशात यापूर्वी 12 वेळा एसआयआर प्रक्रिया झाली. काँग्रेसच्या शासनकाळातही दहा वेळा ही प्रक्रिया राबविण्यात आली. त्यावेळी भाजप किंवा जनसंघाने विरोध केला नव्हता. मतदार यादीचे शुद्धीकरण ही लोकशाहीच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे असे शुक्ला यांनी सांगितले. देशात 13 कोटी मतदारांची नावे वगळल्याच्या आरोपावर बोलताना त्यांनी स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी आणि सर्वेक्षणादरम्यान अनुपस्थिती ही कारणे सांगितली. महाराष्ट्रात 17 लाख दुबार मतदार असल्याचाही दावा त्यांनी केला.





