मंत्रालय उपहारगृहात गुजराती खाद्यपदार्थांना विशेष स्थान

महाराष्ट्राच्या कांदापोह्यांना मेन्यूतून वगळले

विधानभवनाच्या उपहारगृहात पौष्टीक पदार्थाना प्राधान्य

मुंबई /12 नोव्हेंबर: राज्याच्या प्रशासकीय कारभाराचे केंद्र असलेल्या मंत्रालय उपहारगृहाच्या मेन्यूत आता गुजराती खाद्यपदार्थांना विशेष स्थान देण्यात आले आहे. 54 प्रकारच्या पदार्थांच्या यादीत मूग ढोकळा, पांढरा ढोकळा, कच्छी दाबेलीचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्राचा पारंपरिक खाद्यपदार्थ मानल्या जाणार्‍या कांदापोह्यांना मेन्यूतून वगळण्यात आले आहे. उपहारगृहात येणार्‍यांच्या ताटात उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय पदार्थही पडणार आहेत.
सध्याची बदलती जीवनशैली आणि संतुलित पोषण आहाराचा अभाव यामुळे सरकारी कर्मचार्‍यांच्या आरोग्यावर होणारा प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन राज्य सरकारने मंत्रालय तसेच विधानभवनाच्या उपहारगृहात पौष्टीक खाद्यपदार्थ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रकृतीला हानिकारक ठरणारे तळलेले अथवा चटकदार खाद्यपदार्थ मेन्यूतून बाद करण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ बैठक अथवा शासकीय बैठकांच्यावेळी बटाटेवडे, भजी, समोसे असे तळलेले खाद्यपदार्थ देऊ नयेत. नेहमीच्या चहा, कॉफीऐवजी लेमन टी, ग्रीन टी द्यावा असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालय, विधानभवन आणि कोकणभवन येथील उपहारगृहांसाठी नव्या खाद्यपदार्थाची यादी आणि त्यांचे दर निश्चित केले आहेत. खाद्यपदार्थांच्या यादीत पुणेरी मिसळ, शेगांव कचोरी, शेवई उपमा, कोथिंबीर वडी यांचा समावेश आहे. याशिवाय इडली, पालक इडली, व्हेज इडली, पौष्टिक इडली, साधी इडली, मूग इडली, विविध प्रकारची इडली, ओनियन उत्तप्पा, पेपर डोसा, मसाला डोसा अशा दाक्षिणात्य पदार्थांची उपहारगृहात रेलचेल असणार आहे. उपहारगृहातील एकाच प्रकारच्या पदार्थासाठी अधिकारी आणि कर्मचार्‍यांना वेगवेगळे दर आकारण्यात येणार आहेत.

उपहारगृहातील खाद्यपदार्थांची यादी

बीट कबाब                   – कर्मचार्‍यांसाठी 20 रुपये, अधिकार्‍यांसाठी 25 रुपये
काँकटेल समोसा           – कर्मचार्‍यांसाठी 15 रुपये, अधिकार्‍यांसाठी 20 रुपये
झटका भेळ                  – कर्मचार्‍यांसाठी 20 रुपये, अधिकार्‍यांसाठी 25 रुपये
व्हेज मंचाव सूप             – कर्मचार्‍यांसाठी 20 रुपये, अधिकार्‍यांसाठी 25 रुपये
कच्छी दाबेली                – कर्मचार्‍यांसाठी 30 रुपये, अधिकार्‍यांसाठी 35 रुपये
पावभाजी                      – कर्मचार्‍यांसाठी 40 रुपये, अधिकार्‍यांसाठी 45 रुपये
शेगाव कचोरी                – कर्मचार्‍यांसाठी 30 रुपये, अधिकार्‍यांसाठी 35 रुपये
शेवयांचा उपमा              – कर्मचार्‍यांसाठी 25 रुपये, अधिकार्‍यांसाठी 30 रुपये
पुणेरी मिसळ                 – कर्मचार्‍यांसाठी 30 रुपये, अधिकार्‍यांसाठी 35 रुपये
पंजाबी समोसा               – कर्मचार्‍यांसाठी 20 रुपये, अधिकार्‍यांसाठी 25 रुपये
ओनियन उत्तपा              – कर्मचार्‍यांसाठी 20 रुपये, अधिकार्‍यांसाठी 25 रुपये

Back to top button