अमरावती लोकसभेवर भाजपचाच झेंडा फडकणार
पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास

निष्क्रिय लोकप्रतिनिधींना घरी बसविण्याचे संकेत
नवनीत राणा यांना पुन्हा संसदेत पाठविण्याचा निर्धार
अमरावती/12 नोव्हेंबर– आगामी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचाच विजय होणार असल्याचा ठाम विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. नाव न घेता विद्यमान खा. बळवंत वानखडे यांच्या कारभारावर निशाणा साधत निष्क्रिय लोकांना घरी पाठवून नवनीत राणा यांना पुन्हा प्रचंड मताधिक्याने संसदेत पाठवू असा निर्धार त्यांनी या वेळी बोलून दाखवला.
अमरावती येथे गुरुवार रोजी आयोजित कार्यक्रमात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आ. रवी राणा यांचे नेतृत्व हे अत्यंत झुंजार असल्याचे कौतुक करत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला. मागील निवडणुकीत काही कारणांमुळे थोडी कसर राहिली असली तरी आता अजिबात काळजी करण्याचे कारण नाही असा थेट दिलासा त्यांनी नवनीत राणा यांना दिला. पुढील काळात सर्व ताकदीनिशी कामाला लागून ही कसर नक्कीच भरून काढली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. या मतदारसंघातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय नेतृत्वाची गरज असून सध्याचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याची अप्रत्यक्ष टीका त्यांनी खा. बळवंत वानखडे यांचे नाव न घेता केली. यापुढे काम न करणार्यांना मतदार थेट घरचा रस्ता दाखवतील असे ते म्हणाले. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम नेतृत्वाखाली देश प्रगती करत असून त्यांच्याच पाठीशी अमरावतीची जनता पुन्हा एकदा ठामपणे उभी राहील. महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवतील आणि अमरावतीची जागा पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने जिंकून आणतील असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केला. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.





