लाल किल्ल्यावरून ‘गरीबी हटाव’ चे नारे देणारे अनेक नेते

आता परिस्थिती बदलली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर निशाणा

तर डिझेलचे दर 50 रुपये लीटरने वाढले असते

इंधनाच्या दरवाढीवर पंतप्रधान मोदींचे विधान

नवी दिल्ली/12 नोव्हेंबर : देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्या दिशेने भारताची वेगाने वाटचाल सुरू आहे. हे लक्ष्य साध्य करणे अशक्य नसून, देशातील वैज्ञानिक, नागरिक आणि मेहनतीच्या जोरावर अनेक महत्त्वाचे टप्पे यापूर्वीच पार करण्यात आले आहेत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. दरम्यान, एकेकाळी लाल किल्ल्यावरून अनेक नेत्यांनी ‘गरीबी हटाव’च्या घोषणा दिल्या; मात्र आता परिस्थिती बदलत असून, गरीब नागरिक स्वतःच्या प्रयत्नांतून गरिबीवर मात करत आहेत, असे सांगत त्यांनी विरोधकांनाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.
दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी विकसित भारताचे ध्येय, देशाने विविध क्षेत्रांत केलेली प्रगती आणि गरिबी निर्मूलनाच्या प्रयत्नांवर भाष्य केले. तसेच पत्रकारांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी डेडलाईनच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला.
पत्रकारितेच्या क्षेत्रात वेग आणि तत्परता जितकी महत्त्वाची आहे, तितकीच काम पूर्ण करण्यासाठी निश्चित केलेली अंतिम मुदतही महत्त्वाची असते. प्रत्यक्ष घटनास्थळी काम करणार्‍या पत्रकारांचे संपूर्ण कामकाज डेडलाईनभोवती फिरते. एखादे काम कधी पूर्ण करायचे, याची मर्यादा निश्चित नसेल तर त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे व्यक्ती, संस्था आणि देशाच्या प्रगतीसाठीही निश्चित कालमर्यादा आवश्यक असते, असे मोदी म्हणाले. भारतानेही आता विकासासाठी 2047 हे वर्ष निश्चित केले आहे. स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण होण्यापूर्वी देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अंतिम उद्दिष्ट निश्चित झाल्यानंतर कामाचे प्राधान्यक्रम, कार्यपद्धती आणि कामाचा वेग बदलतो. सध्या भारत ज्या दिशेने प्रगती करत आहे, ती पाहता विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करणे कठीण नसल्याचे त्यांनी नमूद केले.भारताने गेल्या काही वर्षांत विविध क्षेत्रांत मिळवलेल्या यशाचा उल्लेख करताना मोदी यांनी अनेक उदाहरणे दिली. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचून तेथे ध्वज रोवणारा पहिला देश बनेल, याची पूर्वी कोणी कल्पनाही केली नव्हती. तसेच मोबाइल उत्पादन क्षेत्रात भारत जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश बनेल, असेही अनेकांना वाटले नव्हते.
चिनाब नदीवरील देशातील सर्वाधिक उंचीचा रेल्वे पूल, सौरऊर्जा निर्मिती क्षमतेत झालेली वाढ आणि यूपीआयच्या माध्यमातून विकसित झालेले जगातील आघाडीचे रिअल टाइम पेमेंट नेटवर्क ही भारताच्या प्रगतीची ठळक उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले. मागील 12 वर्षांत सौरऊर्जा क्षमतेत 50 टक्क्यांची वाढ झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला.या सर्व उपलब्धी वैज्ञानिक, देशातील सामान्य नागरिक आणि सातत्याने मेहनत घेणार्‍या लोकांच्या योगदानामुळे शक्य झाल्या आहेत. त्यामुळे विकसित भारताचे ध्येय केवळ स्वप्न न राहता प्रत्यक्षात साकार होऊ शकते, असे मोदी यांनी स्पष्ट केले. विकसित भारतासाठी 2047 हे वर्ष निश्चित केले असले, तरी त्या वर्षापर्यंत केवळ प्रतीक्षा करत बसायचे नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्यप्राप्तीचे अंतिम ध्येय निश्चित झाल्यानंतर त्यासाठी अनेक छोटी उद्दिष्टे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आली. या प्रयत्नांमुळेच जनतेमध्ये स्वातंत्र्य मिळविण्याचा विश्वास निर्माण झाला.

Back to top button