चिंचोली गवळीच्या चिचपूर शिवारात बिबट्याचा हल्ला; वासराला केले ठार
शेतात बांधलेली पाळीव जनावरेही असुरक्षित; शेतकर्यांसमोर दुहेरी संकट

चिंचोली गवळी/11 नोव्हेंबर – चिंचोली गवळी येथील चिचपूर शिवारात बिबट्याने हल्ला करून एका वासराला ठार केल्याची घटना काल मध्यरात्री घडली. गोपीचंद केळकर यांच्या शेतात बांधलेल्या जनावरांवर अचानक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून, त्याला ओढून नेण्याचाही बिबट्याने प्रयत्न केला. मात्र, वासरू खुट्याला बांधलेले असल्याने बिबट्याला ते घेऊन जाणे शक्य झाले नाही. दरम्यान, परिसरात झालेल्या आवाजामुळे बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या परिसरात पाण्याची कमतरता आणि जनावरांसाठी चार्याचे संकट निर्माण झाले आहे. यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे गावाच्या आजूबाजूला जनावरांना खाण्यायोग्य चारा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आपल्या पाळीव जनावरांना पुरेसा चारा आणि पाणी मिळावे, या उद्देशाने अनेक पशुपालक जनावरे गावातील गोठ्यांऐवजी शेतामध्ये नेऊन बांधत आहेत. मात्र, आता शेतातही पाळीव जनावरे सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. चिंचोली गवळी परिसर सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने या भागात जंगलाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पूर्वीपासूनच गावातील नागरिक आपल्या पाळीव जनावरांना गावातील गोठ्यांमध्ये सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य देत होते. परंतु यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, जनावरांच्या चार्याची व्यवस्था करण्यासाठी पशुपालकांना शेतातच जनावरे ठेवण्याची वेळ आली आहे. एकीकडे पाण्याची टंचाई, दुसरीकडे शेतीच्या उत्पन्नात घट आणि त्यातच आता जंगली प्राण्यांकडून पाळीव जनावरांवर होणारे हल्ले, अशा तिहेरी संकटात ग्रामीण भागातील पशुपालक सापडले आहेत. शेतात जनावरे बांधूनही त्यांची सुरक्षा धोक्यात येत असल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेची दखल घेऊन वनविभाग व संबंधित प्रशासनाने परिसरात पाहणी करावी, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच नुकसानग्रस्त पशुपालकाला शासन नियमानुसार तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी. यासोबतच पाळीव जनावरांच्या संरक्षणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.





