जनजाती गौरव दिन सप्ताह; विविध योजनांचा लाभ घ्या

पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांचे आवाहन

अकोला /11 नोव्हेंबर– भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर हा दिवस देशभरात ‘जनजाती गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त शासनाच्या वतीने 11 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत ‘भगवान बिरसा मुंडा गौरव दिन सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमांमध्ये आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन काम गार मंत्री तथा अकोला
जिल्ह्याचे
पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल-जंगल-जमीन यांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक सुधारणांसाठी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी समाजाचे योगदान, संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, असे फुंडकर यांनी सांगितले. सप्ताहात विशेष कार्यक्रम घेऊन न्यूक्लियस बजेट, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान तसेच महिला बचत गटांच्या लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात येणार आहेत. याशिवाय स्वयंरोजगार, व्यवसाय आणि आर्थिक स्वावलंबनासाठी मार्गदर्शन करण्यात येईल. त्याचप्रमाणे, आदिवासी स्मारकांची स्वच्छता, दीपोत्सव आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम आयोजित केले जातील. 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची 151 वी जयंती साजरी करण्यात येणार असून, त्यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करण्यात येईल. तसेच आदिवासी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजनायकांचा गौरव करण्यात येणार आहे.16 तारखेला आधार कार्ड व शासकीय कागदपत्र सेवा शिबिर, 17 नोव्हेंबर रोजी आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर, तर 18 नोव्हेंबर रोजी आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिन आणि सप्ताहाचा समारोप होणार आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना शासकीय योजनांची माहिती, विविध प्रमाणपत्रे, कृषीविषयक मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, शैक्षणिक संधी, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगाराच्या योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नशील असून, या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे.

Back to top button