सणासुदीत खाद्यतेलाचे दर स्थिर; ग्राहकांना दिलासा
आयात शुल्क कपातीचा बाजारभावावर सकारात्मक परिणाम

दिवाळीच्या गर्दीतही तेलाच्या दरवाढीला लगाम
अमरावती/11 नोव्हेंबर– सणासुदीच्या काळात खाद्यतेलाची मागणी वाढलेली असतानाही घाऊक बाजारात तेलाचे दर स्थिर राहिल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने सप्टेंबरच्या अखेरीस आयात होणार्या खाद्यतेलावरील मूलभूत सीमाशुल्क कमी केल्याने तेलाच्या किमती नियंत्रणात राहण्यास मदत झाली.
कच्च्या सूर्यफूल तेलावरील शुल्क 10 टक्क्यांवरून शून्य, तर परिष्कृत सूर्यफूल तेलावरील शुल्क 32.5 टक्क्यांवरून 22.5 टक्के करण्यात आले. तसेच कच्च्या सोयाबीन व पाम तेलावरील शुल्क 10 टक्क्यांवरून 5 टक्के, तर परिष्कृत सोयाबीन व पाम तेलावरील शुल्क 32.5 टक्क्यांवरून 27.5 टक्के करण्यात आले. या निर्णयाचा थेट फायदा घाऊक बाजारात दिसून येत आहे. तेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा सिताराम ट्रेडर्सचे संचालक मनोज शर्मा यांनी सांगितले की, आयात शुल्कातील कपातीमुळे घाऊक बाजारातील तेलाचे दर वाढण्यापासून रोखले गेले. दिवाळीच्या गर्दीच्या काळात प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची खरेदी झाली. विशेष म्हणजे 15 किलोच्या डब्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. सध्या घाऊक बाजारात सोयाबीन तेलाचा 15 किलोचा डबा 2,400 रुपये, पाम तेल 2,340 ते 2,350 रुपये, सूर्यफूल तेलाचा 15 लिटरचा डबा 2,480 ते 2,490 रुपये, तांदळाच्या कोंड्याचे तेल 2,380 रुपये, तर शेंगदाणा तेलाचा 15 किलोचा डबा 2,880 रुपयांना मिळत आहे. किरकोळ बाजारात शेंगदाणा तेलाचा प्रतिलिटर दर 195 ते 200 रुपये, तांदळाच्या कोंड्याचे तेल 157 रुपये, सूर्यफूल तेल 180 रुपये, तर सोयाबीन तेल 160 रुपये प्रतिलिटर आहे. डिसेंबरमध्ये सोयाबीनचे नवीन पीक बाजारात दाखल झाल्यानंतर या तेलाचे दर स्थिर राहण्याची शक्यता व्यापार्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, गुजरातमध्ये शेंगदाणा उत्पादनात 20 टक्के घट होण्याचा अंदाज असल्याने आगामी काळात शेंगदाणा तेल महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या दर स्थिर असले तरी पुढील काळात शेंगदाणा तेलाच्या किमतींकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.





