धारणी कृषी महाविद्यालयाचा कारभार संशयाच्या भोवर्‍यात

प्राचार्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप, अकोल्यातील वास्तव्यासह कर्मचार्‍यांच्या हजेरीवर प्रश्न

धारणी /11 नोव्हेंबर – आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने सुरू झालेल्या धारणी येथील शासकीय कृषी तंत्रनिकेतनच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्राचार्य अरविंद मेकसर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत महिन्यातील 20 दिवस अकोल्यात वास्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कर्मचार्‍यांची कार्यालयीन वेळेतील अनुपस्थिती, चणा आणि तुरीच्या साठवणुकीत झाल्याचा आरोप असलेले नुकसान, तसेच आर्थिक व्यवहारांतील त्रुटींची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे. मागील 5 वर्षांचे विशेष लेखापरीक्षण करून विद्यापीठाच्या कुलगुरूंनी स्वतंत्र समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.ऑगस्ट 2011 मध्ये तत्कालीन आमदार केवलरामजी काळे यांच्या उपस्थितीत या संस्थेचे भूमिपूजन झाले होते. मात्र, सध्या संस्थेच्या व्यवस्थापनावरून तक्रारी वाढत आहेत. प्राचार्य अरविंद मेकसर हे 2019 पासून येथे कार्यरत आहेत. ते महिन्यातील सुमारे 20 दिवस अकोल्यातील राम हेरिटेज फ्लॅटमध्ये राहत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची आणि कामकाजावरील नियंत्रणाची तपासणी करण्याची मागणी होत आहे. संस्थेतील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहत असल्याच्या तसेच कामाच्या वेळेत बाहेर जात असल्याच्या तक्रारी आहेत. केवळ कागदोपत्री हजेरी न तपासता प्रत्यक्ष उपस्थितीची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, संस्थेत उत्पादित चणा आणि तुरीची गोदामात योग्य साठवणूक न झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. या नुकसानीचा पंचनामा करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली आहे. संस्थेत स्वतंत्र आस्थापना विभाग नसल्याने कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्था सक्षम करण्याची गरज व्यक्त होत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या संस्थेची कुलगुरूंनी प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी आहे. उपस्थिती नोंदवही, दौरा नोंदवही, कृषी उत्पादनाचा साठा, आर्थिक व्यवहार आणि मागील 5 वर्षांचे लेखापरीक्षण तपासून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, असा आग्रह धरला जात आहे.

चौकशीच्या सात मागण्यांतून कारभारावर लक्ष

धारणीच्या शासकीय कृषी तंत्रनिकेतनमधील तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे. प्राचार्यांची उपस्थिती, कर्मचार्‍यांची हजेरी, दौरा नोंदवही, चणा आणि तुरीचा साठा, कृषी उत्पादनाचे नुकसान, मागील 5 वर्षांचे आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय नियंत्रण या सात बाबींची तपासणी करावी. विद्यापीठाने स्वतंत्र समिती नेमून प्रत्यक्ष पाहणी करावी. चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेल्या या संस्थेचा कारभार सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.

Back to top button