राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा, 600 विवाह इच्छुकांचा सहभाग
‘सोयरीक’ पुस्तिकेचे प्रकाशन, सामूहिक विवाहांना प्राधान्य देण्याचे आ. रवी राणा यांचे आवाहन

अमरावती /11 नोव्हेंबर – विवाह जुळवताना येणार्या अडचणी दूर व्हाव्यात, अनावश्यक खर्चाला आळा बसावा आणि समाजातील विवाह इच्छुक तरुण-तरुणींना योग्य जोडीदार निवडण्याची संधी मिळावी, या उद्देशाने शिव संभाजी स्वराज्य प्रतिष्ठान, अमरावती यांच्या वतीने 10 नोव्हेंबर रोजी अभियंता भवन, अमरावती येथे राज्यस्तरीय मराठा पाटील कुणबी समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्याला सुमारे 600 विवाह इच्छुक युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी वधू-वरांची सविस्तर माहिती असलेल्या ‘सोयरीक’ पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य देऊन लग्नातील अनावश्यक खर्च टाळावा, असे आवाहन आ. रवी राणा यांनी केले. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा काळात लग्नासाठी मोठा खर्च करण्यापेक्षा सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणे गरजेचे असून, त्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. काँग्रेस नेते डॉ. सुनील देशमुख यांनी समाजातील अनिष्ट प्रथा, लग्नसमारंभातील अनावश्यक खर्च आणि दिखाव्याला आळा घालण्याची गरज व्यक्त केली. बदलत्या काळानुसार मराठा पाटील कुणबी समाजाने जुन्या प्रथा बाजूला ठेवून नव्या विचारांचा स्वीकार करावा, असे मत त्यांनी मांडले. प्रतिष्ठानचे मार्गदर्शक तथा युवा स्वाभिमान पक्षाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांनी सांगितले की, गेल्या 6 वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने वधू-वर परिचय मेळावे घेतले जात आहेत. या उपक्रमातून आतापर्यंत 2,500 पेक्षा अधिक विवाह जुळविण्यात यश आले आहे. हा उपक्रम समाजासाठी महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामगीताचार्य पौर्णिमा सवाई यांनी नवविवाहित जोडप्यांच्या संसारात पालकांनी अनावश्यक हस्तक्षेप न करता त्यांना सकारात्मक पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. ज्योतिषाचार्य ह.भ.प. सागर महाराज देशमुख यांच्या आशीर्वादपर मार्गदर्शनाने मेळाव्याला सुरुवात झाली. आयोजक नीलेश पाटील उभाड यांच्या या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. मेळाव्याचे उद्घाटन ज्योतिषाचार्य आचार्य ह.भ.प. सागर महाराज देशमुख आणि आ. प्रवीण तायडे यांच्या हस्ते झाले. यावेळी संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप काळे, अमरावतीचे उपमहापौर सचिन भेंडे, नरेश बर्डे, नाना नागमोते, विनोद कोरडे, विलास महाराज साबळे, प्रतीक खुरद, पंकज तायडे, राजेंद्र लहाने, सुभाषचंद्र भोयर, सुहास मोरखडे, राजेश राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिप्रा मानकर यांनी केले.





