संत गाडगेबाबांना भारतरत्न मिळावे यासाठी धडपड

वलगाव ते महाबळेश्वर दुचाकी प्रवासाला सुरुवात, मुलगा सार्थकसह नितीन मुळे पाटील यांचा पुढाकार

अमरावती/11 नोव्हेंबर – राष्ट्रसंत गाडगेबाबांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मिळावा आणि त्यांचा 10 सूत्री कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने पत्रकार नितीन मुळे पाटील यांनी मुलगा सार्थक याच्यासोबत वलगाव ते महाबळेश्वर दुचाकी प्रवास सुरू केला.
या प्रवासातून गाडगेबाबांचे समाजसुधारणेचे विचार, स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवसेवेचा संदेश गावागावांत पोहोचवण्यासोबतच केंद्र सरकारकडे भारतरत्न देण्याची मागणी मांडली जाणार आहे. क्रमांक एक वृत्तवाहिनीचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव नितीन मुळे पाटील यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. वलगाव येथील संत गाडगेबाबांच्या निर्वाणभूमीतून या प्रवासाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत करून नितीन मुळे पाटील यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. राजेंद्र निर्मळ, संजय काणे, मामासाहेब निर्मळ, गजानन कडू, राजेंद्र जोशी, डॉ. सोमेश्वर निर्मळ, प्रकाश बनारसे, डॉ. कैलास बोरे, विष्णू बगळे, ज्ञानेश्वर सैरीसे, ज्ञानेश्वर लव्हाळे, संतोष खोरे आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष नयन मोंढे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रवासाच्या माध्यमातून गाडगेबाबांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Back to top button