मुंबईत भरदिवसा गोळीबार, एकाचा मृत्यू

फरार आरोपीचा शोध सुरु

मुंबई /11 नोव्हेंबर : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत गोळीबाराची घटना घडली आहे. कुर्ल्यातील माकडवाला परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. आरोपींकडून तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या या घटनेत विनोद पवार यांचा मृत्यू झाला आहे. पूर्ववैमनस्यातून ही गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
गोळीबाराच्या या घटनेनंतर मृतक विनोद पवार यांच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. विनोद पवार यांच्या नातेवाईकांनी संशियत आरोपी नेहल पवार याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. या मागणीसाठी नातेवाईकांनी कुर्ला पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं. आरोपी हे दुचाकीवरुन आले होते. त्यांचे पूर्ववैमनस्य होते. या पूर्ववैमन्सातून त्यांनी खून केला आहे. या प्रकरणी व्ही.बी.नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आमचे एकूण 12 पथकं तपासाचं काम करत आहेत. या प्रकरणात प्राथमिकदृष्ट्या दोन आरोपी दिसत आहेत. तपासात आणखी माहिती समोर येऊ शकते. पुढील तपास हा केला जातोय, अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकार्‍यांनी दिली. मृतक विनोद पवार यांचे नातेवाईक असलेल्या एका महिलेने थेट फोटो दाखवत ते आरोपी असल्याचा दावा केला. आरोपी चार जण असून आम्हाला सीबीआयची मदत हवी आहे. याआधीदेखील त्यांचाच हात होता आणि आतादेखील त्यांचाच हात आहे. आरोपींचा एन्काउंटर किंवा त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. दोघांपैकी एक गोष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाहीत. वर्षभर पोलीस ठाण्यासमोर उभं राहावं लागलं तरी चालेल, अशी प्रतिक्रिया महिला नातेवाईकाने केली आहे.

Back to top button