नागझिरा अभयारण्यात वाघाचा संशयास्पद मृत्यू; सात संशयितांना अटक

गोंदिया/11 नोव्हेंबर : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा अभयारण्यातील कोअर झोनमध्ये एका वाघाचा मृतदेह आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.प्राथमिक तपासणीत वाघाचा मृत्यू विद्युत प्रवाहामुळे झाल्याचा संशय पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची चौकशी करताना वनविभागाने सात संशयितांना अटक केल्याची माहिती नागझिरा खंडाचे उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे यांनी दिली. त्यामुळे या मृत्यूमागील नेमके कारण आणि संभाव्य शिकारीचा संबंध याबाबत तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव 10 नोव्हेंबर 2026 रोजी नागझिरा कोअर सहवनक्षेत्रातील थाटेझरी बिटाच्या कक्ष क्रमांक 99 मधील राखीव वन परिसरात वनकर्मचारी सामूहिक गस्त घालत असताना त्यांना वाघ मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पियुष जगताप, नागझिरा खंडाचे उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे, सहायक वनसंरक्षक विपीन लांडगे, गस्ती पथकप्रमुख महेंद्र भांगरे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी ए. व्ही. लांबट यांनी घटनास्थळी धाव घेतली. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) प्रमाणित कार्यपद्धतीनुसार विशेष समिती स्थापन करून मृत वाघाची तपासणी करण्यात आली. समितीमध्ये मानद वन्यजीव रक्षक सांवत बहेकार, एनटीसीए प्रतिनिधी रुपेश निवाते, वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे सदस्य इद्रिस अहमद आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांचा समावेश होता.समितीच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय पथकाने वाघाचे शवविच्छेदन केले. प्राथमिक निरीक्षणानुसार विद्युत प्रवाहामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी पुढील तपासणी आवश्यक आहे.

Back to top button