शिकाऊ विमानाचा अपघात, सुदैवाने महिला वैमानिक बचावली

सोलापुरात उड्डाणापूर्वीच धावपट्टीवरून घसरलं

सोलापूर/12 नोव्हेंबर- सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उड्डाणासाठी धावपट्टीवरून वेग घेत असताना विमानावरील नियंत्रण सुटल्यानं हे विमान धावपट्टीच्या बाजूला घसरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत विमानातील महिला शिकाऊ वैमानिकाला कोणतीही दुखापत झाली नाही. त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला आहे. महिला शिकाऊ वैमानिक प्रशिक्षणाचा भाग म्हणून विमानाचं उड्डाण (टेक-ऑफ) घेत होती. यावेळी धावपट्टीवर वेग घेत असताना अचानक विमान धावपट्टीवरून बाजूला घसरलं. या अनपेक्षित घटनेमुळे विमानतळावरील यंत्रणेची धावपळ उडाली. मात्र, वैमानिक सुरक्षित असल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. तांत्रिक बिघाड, विमानावरील नियंत्रण किंवा अन्य काही कारण यामागे आहे का? याची माहिती अधिकृत तपासानंतरच समोर येऊ शकणार आहे. विशेष म्हणजे, सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती अथवा स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे अपघाताचं नेमकं कारण, विमानाचं झालेले नुकसान आणि पुढील कार्यवाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. महिला वैमानिक सुखरूप असली तरी शिकाऊ विमान धावपट्टीवरून घसरण्याच्या या घटनेनं विमानतळावरील प्रशिक्षण व्यवस्था, विमानांची तांत्रिक तपासणी आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Back to top button