भीषण अपघातात 23 जणांचा मृत्यू

मिनी बस-कंटेनरची समोरासमोर धडक

काजीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळील थरारक घटना
बस कापून मृतदेह बाहेर काढले

गुवहाटी/13 नोव्हेंबर : आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ शुक्रवारी (दि. 13) भीषण रस्ते अपघात झाला. मिनी बस आणि कंटेनर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन 23 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी जखमी झाले.
गोलाघाट जिल्ह्यातील कोहोरा रेंजमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 715 वर हातिकुली टी इस्टेटजवळ रंगाजन परिसरात ही दुर्घटना घडली. धडक इतकी जोरदार होती की मिनी बसचा मोठा चुराडा झाला. अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले.
गोलाघाटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्वप्ननील डेका यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगामुळे मिनी बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे. त्यामुळे बस समोरून येणार्‍या कंटेनर ट्रकला धडकली असण्याची शक्यता आहे.मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होईल. सुरुवातीला या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, उपचारादरम्यान आणखी काही जखमींचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 23 वर पोहोचला.
अपघातातील जखमींना सुरुवातीला कोहोरा मॉडेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी जोरहाट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आत अडकलेल्या प्रवाशांना बस कापून मृतदेह बाहेर काढले. बचाव पथकाला अडचणींचा सामना करावा लागला. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे मदतकार्य केले. आसामचे पंचायत व ग्रामीण विकास मंत्री अतुल बोरा यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. ते या भागाचे स्थानिक आमदारही आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. काझीरंगा येथे झालेल्या अपघातामुळे मन व्यथित झाले. अपघातात बळी पडलेल्यांची संख्या ऐकून सर्वांनाच धक्का बसला. ज्यांनी आपले प्रियजन गमावले, त्यांच्या दुःखात मी आणि संपूर्ण राज्य सामील आहे. कोणत्याही शब्दांनी हे दुःख कमी होणार नसले तरी मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही एकटे नाही आहात. संपूर्ण आसाम राज्य तुमच्या पाठीशी आहे.

Back to top button