हज यात्रेसाठी भारताला 1 लाख 75 हजारचा कोटा

सौदी अरेबियासोबत झाला करार

दुबई/12 नोव्हेंबर: 2027 मध्ये होणार्‍या हज यात्रेसाठी भारताला 1 लाख 75 हजार 25 यात्रेकरूंचा कोटा मिळाला आहे. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात सोमवारी यासंदर्भातील द्विपक्षीय करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या, अशी माहिती जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने दिली.
केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सौदीचे हज आणि उमरा मंत्री तौफिक बिन फौझान अल राबिया यांच्याशी जेद्दाह येथे चर्चा केल्यानंतर या करारावर स्वाक्षर्‍या केल्या. हज-2027 च्या तयारीचा आढावा, द्विपक्षीय समन्वय आणि यात्रेकरूंना आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली. भारताचा हज कोटा 2014 मध्ये 1 लाख 36 हजार 20 होता. 2025 मध्ये तो वाढून 1 लाख 75 हजार 25 झाला. यंदा आणि पुढील वर्षासाठीही तो कायम ठेवण्यात आला आहे. रिजिजू यांनी सौदी नेतृत्वाचे आभार मानले. हज यात्रेच्या तयारीसाठी भारतीय हज समिती आणि संबंधित अधिकार्‍यांसोबतही त्यांनी आढावा बैठक घेतली.

Back to top button