इस्कॉनतर्फे श्री रामनवमी महामहोत्सव
सीताराम लक्ष्मण हनुमान यांचा महाअभिषेक

अमरावती /23 मार्च : येथील राठी नगर परिसरातील सरस्वती कॉलनीमध्ये असलेल्या श्री श्री रुक्मिणी आध्यात्मिक संस्कार केंद्र (इस्कॉन) तर्फे 27 मार्च रोजी ’श्री रामनवमी महामहोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानजींचा मंगलमयी महाअभिषेक सोहळा संपन्न होणार असून, संपूर्ण अमरावती शहर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघणार आहे. जागतिक कीर्तीचे कीर्तन सम्राट परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत आहे. यंदा तिथीनुसार 27 मार्च रोजीच नवमी येत असल्याने, याच दिवशी अयोध्या नगरीप्रमाणे अमरावतीतही रामजन्मोत्सव साजरा केला जाईल. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांनी सत्य आणि धर्माचा आदर्श जगासमोर ठेवला. त्याच आदर्शांची आणि आध्यात्मिक ज्ञानाची शिदोरी जनमानसापर्यंत पोहोचवणे, हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. कलियुगात भगवंताचे नामस्मरण हेच दुःखातून मुक्तीचे श्रेष्ठ साधन असून, या संकीर्तनातून समाजात शांती, एकता आणि प्रेमाचा संदेश दिला जाईल. या सोहळ्याची सुरुवात पहाटे 4:30 वाजता मंगल आरतीने होईल. त्यानंतर सामूहिक नामजप, दर्शन आरती आणि गुरुपूजा पार पडेल. सकाळी 10:30 वाजता श्रीराम कथा होईल आणि त्यानंतर मुख्य आकर्षण असलेला महाअभिषेक सोहळा पार पडेल. दुपारी 56 भोगांच्या दर्शनानंतर महाआरती होईल आणि 1 वाजता महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होईल. इस्कॉनचे अध्यक्ष अद्वैत आचार्य प्रभूजी यांनी सर्व भाविकांना या मंगलप्रसंगी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.




