ढिगार्याखाली दबलेल्या चार मजुरांचे मृतदेह शोधण्यात यश
आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

25 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचावकार्य पूर्ण
पंढरपूर/16 नोव्हेंबर – आंबे (ता. पंढरपूर) येथे विहीर खोदकाम सुरू असताना माती व दगडाचा मोठा ढिगारा कोसळून विहिरीत अडकलेल्या चार कामगारांच्या बचावासाठी प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेले अभियान तब्बल 25 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्ण झाले. या दुर्घटनेत चारही कामगारांचा मृत्यू झाला असून, घटनास्थळीच वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर चारही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी प्रांताधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार आहे. चौकशीत दोषी आढळणार्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. आंबे येथे रविवार, दि. 15 नोव्हेंबर 2026 रोजी विहीर खोदकाम सुरू असताना अचानक माती व दगडाचा मोठा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत चार कामगार ढिगार्याखाली अडकले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग तसेच संबंधित बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. रविवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. विहिरीतील माती व दगडाचा मोठा ढिगारा आणि निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती यामुळे बचाव पथकासमोर मोठे आव्हान होते. बचावकार्यादरम्यान आवश्यक खबरदारी घेत एनडीआरएफच्या पथकाने उपलब्ध साधनसामग्री आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे मोहीम सुरू ठेवली. अखेर चारही कामगारांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.या बचाव मोहिमेत एनडीआरएफच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.





