सणासुदीत पोलिसांची शहरभर कडक नाकाबंदी

प्रवेशमार्गांवर वाहनांची कसून तपासणी सुरू, नियम मोडणार्‍यांवर पोलिसांची तात्काळ दंडात्मक कारवाई

अमरावती/16 नोव्हेंबर– सणासुदीच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने शहरभर कडक बंदोबस्त तैनात केला आहे. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, महत्त्वाचे रस्ते आणि प्रवेशमार्गांवर विशेष नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. वलगाव पोलिसांसह विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ही मोहीम हाती घेतली असून, वाहतूक नियम मोडणार्‍या चालकांवर दंडात्मक कारवाईही सुरू केली आहे. सणांच्या काळात बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी वाढते. तसेच शहरात येणार्‍या आणि बाहेर जाणार्‍या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढते. या गर्दीचा गैरफायदा घेऊन समाजकंटकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. शहरातील विविध ठिकाणी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहनांची तपासणी करत आहेत. चांदूर बाजार टी पॉइंटवर वलगाव पोलिसांनी नाकाबंदी करून ये-जा करणार्‍या वाहनांची तपासणी केली. तसेच राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रवी नगर परिसरासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणीही पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांना थांबवून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या चालकांवर नियमानुसार कारवाई केली जात आहे. या मोहिमेचा उद्देश केवळ दंड वसूल करणे नसून वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे हाही आहे. वाहन चालवताना आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि निष्काळजीपणे वाहन चालवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयास्पद हालचालींवरही पोलिसांची नजर असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी आणि काही संशयास्पद आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे

सणासुदीच्या काळात सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. वाहनचालकांनी आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि वेगावर नियंत्रण ठेवावे. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. अफवा पसरवू नयेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केल्यास शहरातील शांतता, सुरक्षितता आणि वाहतुकीची शिस्त कायम राखणे अधिक सोपे होईल. आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करावे.

Back to top button