दुष्काळामुळे जिल्हा परिषद निवडणुकांना ब्रेक

पाणीटंचाईच्या सावटामुळे निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

अमरावती/16 नोव्हेंबर– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही आता दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणुकांचे वेळापत्रक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावतीसह राज्यातील 10 हून अधिक जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो. जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने निवडणुकीसाठी उपलब्ध असले तरी डिसेंबरनंतर अनेक भागांत पाणीटंचाई गंभीर होण्याचा अंदाज असल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदांसोबतच सहकारी संस्थांच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या असून आता पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबतही अनिश्चितता वाढली आहे.
प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील मोठ्या भागात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. विशेषतः फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत निवडणूक प्रक्रिया राबविणे आणि दुसरीकडे गावोगावी पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे, अशी दुहेरी जबाबदारी प्रशासनावर येणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकार आणि निवडणूक विभागाकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे समजते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदांमधील आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत कायम ठेवून निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निवडणुका घेण्याची तयारी सुरू असली तरी नागपूर येथे होणार्‍या हिवाळी अधिवेशनानंतर प्रशासकीय यंत्रणेवर आणखी कामाचा ताण येण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील नागरिक निवडणुकांची आतुरतेने वाट पाहत असले तरी सध्या पाणीटंचाईचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे निवडणुका नेमक्या कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button