आजपासून मतदारांच्या हक्कांसाठी काँग्रेसचे जनजागृती अभियान

17 ते 25 नोव्हेंबरदरम्यान शहरात ठिकठिकाणी आयोजन

मतदार यादीतील त्रुटींवरून नागरिकांशी साधणार संवाद

अमरावती /16 नोव्हेंबर- मतदार यादीतील कथित घोळ, पात्र मतदारांची नावे वगळण्याचे प्रकार आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा घेऊन अमरावती शहर काँग्रेस समितीच्या वतीने उद्यापासून ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. 17 ते 25 नोव्हेंबरदरम्यान शहरातील विविध प्रभागांत चौपाळा आणि कोपरा सभांचे आयोजन करून नागरिकांमध्ये मतदानाच्या हक्काबाबत जनजागृती केली जाणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार हे अभियान राबविले जात असून, शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या अभियानात काँग्रेसचे बूथस्तरीय प्रतिनिधी, गटाध्यक्ष, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी तसेच प्रदेश आणि शहर जिल्हा काँग्रेस समितीचे प्रतिनिधी विविध भागांत जाऊन नागरिकांशी थेट चर्चा करणार आहेत. मतदारांचा अधिकार, लोकशाहीचे महत्त्व आणि निष्पक्ष निवडणुकीची गरज याबाबत माहिती दिली जाणार आहे. देशभरातील मतदार याद्यांमध्ये कथित अनियमितता, पात्र मतदारांची नावे वगळणे, मतदानातील गैरप्रकार आणि विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. या मुद्द्यांवरून भाजप आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबतही नागरिकांसमोर चर्चा केली जाणार आहे. मतदार यादीतील चुका दुरुस्त होणे आणि प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाची संधी मिळणे गरजेचे असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. या चौपाळांचे आयोजन टप्प्याटप्प्याने शहरातील विविध भागांत केले जाणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता गांधी चौक, 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता यशोदा नगर चौक, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता महेंद्र कॉलनी चौक आणि सायंकाळी 6 वाजता शुक्रवार बाजार, छपरसीपुरा येथे सभा होईल. 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता लालखडी मुख्य चौक, तर 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता इतवारा बाजार चौक येथे कार्यक्रम होणार आहे. अभियानात ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, अनुसूचित जाती-जमाती विभाग, अल्पसंख्याक विभाग आणि काँग्रेस सेवादलासह सर्व आघाड्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकशाहीच्या संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क जपावा, असे बबलू शेखावत यांनी म्हटले आहे.

Back to top button