एसटी बसमधून महिलेची 1 लाख 61 हजारांची पर्स लंपास
सोन्याचे दागिने, रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे गायब

अमरावती/16 नोव्हेंबर– एसटी बसमधून प्रवास करताना महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने, रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. दर्यापूर ते अमरावती प्रवासादरम्यान घडलेल्या या प्रकारात तब्बल 1 लाख 61 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. विशेष म्हणजे, तक्रारदार महिलेच्या आसपास लहान मुलासह प्रवास करणार्या दोन अनोळखी महिला वावरत होत्या. त्यांच्यावर चोरीचा संशय व्यक्त करण्यात आला असून गाडगेनगर पोलिसांनी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मेहेगाव कॉलनी येथील रहिवासी उज्ज्वला अरुण इसोकार (42) या 15 नोव्हेंबर रोजी आपल्या मुलांसह दर्यापूर येथून अमरावतीला येण्यासाठी एसटी बसमध्ये बसल्या होत्या. दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास दोन अनोळखी महिला बसमध्ये चढल्या. त्यांच्यापैकी एकीच्या सोबत दीड वर्षांचे लहान मूल होते. प्रवासादरम्यान या दोघी तक्रारदार महिलेच्या आसपासच बसल्या होत्या. दुपारी 2 वाजताच्या सुमारास उज्ज्वला इसोकार अमरावती येथे बसमधून उतरल्या. त्यांच्या पाठोपाठ संशयित महिलाही खाली उतरल्या. काही वेळानंतर त्यांनी आपली पर्स तपासली असता त्यातील सोन्याचे दागिने आणि रोकड गायब असल्याचे लक्षात आले. पर्समधील सुमारे 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 11 हजार रुपये रोकड चोरीला गेली होती. विशेष म्हणजे, पर्समध्ये मुलीचे आधारकार्ड, पॅनकार्ड, भारतीय स्टेट बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रची एटीएम कार्डे, निवडणूक ओळखपत्र, टपाल कार्यालयाचे कार्ड, पतीचे आधारकार्ड तसेच पासपोर्ट आकाराचे छायाचित्रही होते. या घटनेनंतर उज्ज्वला यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दोन अनोळखी महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 (क) आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल केला असून संशयित महिलांचा शोध सुरू आहे.





