अमरावतीच्या सुरक्षेचा भार दहा ठाण्यांवर
तीन नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव 15 वर्षांपासून रखडला

10 लाख लोकसंख्येसाठी अपुरी यंत्रणा, गुन्ह्यांचा वाढता आलेख
अमरावती /16 नोव्हेंबर – शहराची लोकसंख्या 10 लाखांच्या घरात पोहोचली असताना नागरिकांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी केवळ 10 पोलीस ठाण्यांवर आहे. वाढते नागरीकरण, गुन्ह्यांची संख्या आणि अपुरे पोलीस मनुष्यबळ यामुळे पोलीस प्रशासनावर कामाचा मोठा ताण निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे तपोवन, साईनगर आणि एमआयडीसी परिसरात 3 नवीन पोलीस ठाणी सुरू करण्याचा 2011 मधील प्रस्ताव तब्बल 15 वर्षांनंतरही गृह मंत्रालयाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
त्यामुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस यंत्रणेचा विस्तार कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत राजापेठ, वलगाव, नांदगाव पेठ, नागपुरी गेट, कोतवाली, खोलापुरी गेट, बडनेरा, गाडगेनगर आणि फ्रेजरपुरा यांसह 10 पोलीस ठाणी कार्यरत आहेत. शहराच्या सीमांचा विस्तार झाल्याने अनेक भागांत लोकवस्ती वाढली आहे. मात्र, पोलीस ठाण्यांची संख्या कायम असल्याने उपलब्ध मनुष्यबळावरच सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. 1 जानेवारी ते 14 नोव्हेंबरदरम्यान गाडगेनगर पोलीस ठाण्यात सर्वाधिक 1203 गुन्हे दाखल झाले. फ्रेजरपुरा येथे 988, राजापेठ येथे 968, बडनेरा येथे 721, नागपुरी गेट येथे 679, वलगाव येथे 500, कोतवाली आणि नांदगाव पेठ येथे प्रत्येकी 485, खोलापुरी गेट येथे 339, तर भातकुली येथे 307 गुन्ह्यांची नोंद झाली. गाडगेनगर पोलिसांवर सर्वसामान्य नागरिकांसह महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. आ. सुलभा खोडके, आ. रवी राणा, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख आणि पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी नवीन ठाण्यांसाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. नवीन ठाणी सुरू झाल्यास सध्याच्या पोलीस ठाण्यांवरील ताण कमी होऊन नागरिकांना अधिक चांगली सुरक्षा मिळू शकते. तीन नवीन ठाण्यांची तातडीची गरज-तपोवन, साईनगर आणि एमआयडीसी परिसरातील वाढती लोकवस्ती लक्षात घेता स्वतंत्र पोलीस ठाण्यांची गरज निर्माण झाली आहे. 2011 पासून प्रस्ताव रखडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. नवीन ठाणी सुरू झाल्यास गाडगेनगर, फ्रेजरपुरा आणि राजापेठ पोलीस ठाण्यांवरील कामाचा भार कमी होईल. तसेच गुन्हे नियंत्रण, गस्त आणि तक्रारींचे निराकरण अधिक प्रभावीपणे करता येईल.





