ऑलिम्पिकचे स्वप्न उराशी बाळगत कुमकुमची दमदार कामगिरी

677 गुणांसह राष्ट्रीय पात्रता फेरीत अव्वल स्थान

अमरावती/16 नोव्हेंबर– जपानमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत 3 पदकांची कमाई करून देशाचे नाव उंचावणार्‍या अमरावतीच्या कुमकुम मोहोडे हिने आता 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. मेघालयची राजधानी शिलाँग येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रता फेरीत कुमकुमने तब्बल 677 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे स्वतःचाच 671 गुणांचा जुना विक्रम मोडीत काढत तिने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या यशामुळे तिचा राष्ट्रीय स्तरावरील दावा अधिक मजबूत झाला असून पुढील लक्ष्य 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे आहे.
कुमकुमने पात्रता फेरीत 26 वेळा 10 गुणांचे आणि 10 वेळा अचूक मध्यभागी लक्ष्यभेद केले. यापूर्वी तिची सर्वोत्तम कामगिरी 671 गुणांची होती. मात्र यावेळी तिने स्वतःचाच विक्रम मागे टाकत 677 गुणांची नोंद केली. पहिला क्रमांक मिळवल्याने तिला स्पर्धेतील पहिले सुवर्णपदकही मिळाले. घरगुती अडचणी असूनही कुमकुमने सराव आणि मेहनतीच्या जोरावर ही कामगिरी केल्याचे तिचे प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांनी सांगितले. जपानमधील स्पर्धेत वापरलेल्या जुन्याच धनुष्याच्या साहाय्याने तिने ही कामगिरी केली. ही तिची दुसरी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आहे. पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात कुमकुमचा मिश्र संघातील सहकारी धीरज बोम्मादेवरा याने 680 गुणांसह पहिले स्थान मिळवले. जपानमध्ये या जोडीने रौप्यपदक पटकावले होते. महाराष्ट्राच्या पार्थ साळुंखे याने 679 गुणांसह दुसरे स्थान मिळवले

Back to top button