नागपुरी गेट गुन्ह्यातील फरार तस्कर जेरबंद

अमरावतीत अंमली पदार्थांचे तीन कोटींचे जाळे

गुन्हे शाखेची सुफियान नगरात कारवाई

अमरावती/24 एप्रिल- शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या कोट्यवधींच्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात गुन्हे शाखेने मोठी कामगिरी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणार्‍या दोन अट्टल फरार आरोपींना अखेर सुफियान नगर परिसरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे आंतरराज्यीय ड्रग्ज तस्करीच्या टोळीचे धागेदोरे हाती लागले असून, आतापर्यंत या प्रकरणात एकूण 10 आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.
अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने 8 मार्च 2026 रोजी नागपुरी गेट परिसरातून मेफेड्रोन (एमडी) पावडरची मोठी खेप पकडली होती. या कारवाईत पोलिसांनी अब्दुल फहीम अब्दुल रहीम ऊर्फ फहीम एफबी (वय 25, रा. आझाद नगर) आणि शेख अयान शेख रमजान (वय 20, रा. द्वारका नगर) यांना 2 किलो 80 ग्राम अंमली पदार्थांसह अटक केली होती. या जप्त केलेल्या मालाची किंमत 3 कोटी 11 लाख 85 हजार रुपये असून, वाहनासह एकूण 3 कोटी 12 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, ही अंमली द्रव्ये मुंबईतून अमरावतीतील शेख नाझीम शेख रहीम (वय 34, रा. गवळीपुरा) आणि शेख रहीम ऊर्फ होंगा शेख आदम (वय 60, रा. गवळीपुरा) यांच्यासाठी आणल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यात सहभागी असलेले अन्य आरोपी फरार होते. 23 एप्रिल रोजी गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, या प्रकरणातील फरार आरोपी अब्बास अहमद बशीर अहमद कुरेशी (वय 28, रा. चांदूर बाजार) आणि सकीब जावेद मोहम्मद आसिफ कुरेशी (वय 25, रा. गवळीपुरा) हे रात्री उशिरा सुफियान नगर येथील अपुना बेकरीच्या मागे असलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या घरी येणार आहेत. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि 24 एप्रिलच्या पहाटे दोन्ही आरोपींना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींवर यापूर्वीही अंमली पदार्थ विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.पकडलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या मोठ्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचावते यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली.
या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, मनिष वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने, पोलीस अंमलदार सुनील लासूरकर, फिरोज खान, सतीश देशमुख, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, मनोज ठोसर, आस्तिक देशमुख, मंगेश परिमल, जहीर शेख, सचिन बहाळे, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, विकास गुडधे, अतुल संभे, मिर्झा नईम बेग, नाझीम उद्दीन सय्यद, विशाल वाकपांजर, योगेश पवार, चेतन गुल्हाने, सागर ठाकरे, रणजित गावंडे, राजीक रायलीवाले, सुरज चव्हाण, निखिल गेदाम, चालक संदीप खंडारे, प्रभात पोकळे, चेतन शर्मा आणि राहुल दुधे यांचा समावेश होता.

मुंबईचे ड्रग्ज कनेक्शन उघडअमरावतीत पकडलेला हा साठा मुंबईतून मागवण्यात आला होता. या तस्करीमध्ये सहभागी असलेले आरोपी अत्यंत सराईत असून, त्यांनी तरुणांना नशेच्या जाळ्यात ओढण्याचे मोठे जाळे विणले होते. गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे शहरात छुप्या पद्धतीने चालणार्‍या अंमली पदार्थांच्या काळ्या बाजारावर मोठे प्रहार झाले आहेत. आता पोलीस या टोळीच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी तपास चक्रावून फिरवत आहेत

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button