शहीद पोलिस कर्मचार्‍यांना आयुक्तालयात श्रध्दांजली

आय.जी. महेश पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

अमरावती /21 ऑक्टोबर – देशाची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखताना आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या शौर्याची आठवण काढत अमरावती पोलिस आयुक्तालयात बुधवारी (21 ऑक्टोबर) पोलिस स्मृतिदिन पाळण्यात आला. या वेळी हुतात्मा पोलिसांना मानवंदना देत त्यांच्या त्यागाला अभिवादन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्ज्वला मनोहर नांदेश्वर, पोलिस महानिरीक्षक महेश पाटील, पोलिस आयुक्त राकेश ओला आणि पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अमरावती शहरातील पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने झाली. त्यानंतर पोलिस स्मृतिदिनाचे महत्त्व सांगण्यात आले. देशाच्या रक्षणासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी मानवंदना देऊन शोकशस्त्राच्या माध्यमातून हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यात आला. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणार्‍या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नावांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. देशाच्या सुरक्षेसाठी आणि समाजाच्या रक्षणासाठी पोलिसांनी दिलेल्या योगदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले. कार्यक्रमात जनरल सॅल्यूट, स्मृतिप्रीत्यर्थ 3 फैरींची सलामी आणि अखेरची सलामी देण्यात आली. या गंभीर वातावरणात उपस्थितांनी हुतात्म्यांच्या कार्याला अभिवादन केले. पोलिस स्मृतिदिन हा केवळ शहीद जवानांची आठवण काढण्याचा दिवस नसून, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा आणि त्यागाचा आदर्श पुढे नेण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. देशसेवेसाठी प्राण अर्पण करणार्‍या या वीरांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Back to top button