आंदोलनांचे राजकारण नको; समस्यांवर उपाय शोधा

आंदोलनकर्ते, सरकार, राजकीय नेत्यांना सरसंघचालक डॉ.मोहन भागवतांचा संदेश

नागपूर /21 ऑक्टोबर  : समाजातील समस्यांविरोधात आंदोलने उभी राहणे स्वाभाविक आहे; मात्र, आंदोलनांचा उद्देश समस्यांवर उपाय शोधणे हा असला पाहिजे. आंदोलन राजकारणाचे साधन बनले किंवा एखाद्या व्यक्ती, समूह अथवा विचाराविषयी शत्रुत्वाची भावना ठेवून ते चालविले गेले, तर त्यातून समाजात दुही निर्माण होऊ शकते, असा स्पष्ट संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष समारोपाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवादरम्यान रेशीमबाग मैदानात ते बोलत होते. आंदोलनकर्ते, शांतता-सुव्यवस्था राखणारे शासन-प्रशासन आणि राजकीय नेते या सर्वांनी आपल्या कृतीतून समाजात विसंवाद, द्वेष, कटुता अथवा विभाजन निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
समाजात समस्या असणे आणि व्यवस्थेत त्रुटी असणे स्वाभाविक आहे. त्यातून आंदोलने उभी राहू शकतात; मात्र, भावनांचा उद्रेक झाला तरी कृती संविधान आणि कायद्याच्या चौकटीतच राहिली पाहिजे. बोलणे, वागणे आणि परस्परांशी व्यवहार करताना सभ्यतेची मर्यादा पाळली पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले. मतांचा लाभ, स्वस्त लोकप्रियता किंवा राजकीय फायदा मिळविण्याचा मोह विवेक आणि सद्भावनेवर वरचढ ठरू नये, असा इशाराही त्यांनी दिला.(यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ संपादक संजय गुप्ता, संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, विदर्भ प्रांत सह संघचालक श्रीधर गाडगे आणि नागपुर महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित थे। यासोबतच माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि कॉन्सुल जनरल ऑफ इस्त्राईल टू मीडवेस्ट इंडिया यानिव रेवाच हेदेखील उपस्थित होते. संघाच्य विजयादशमी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, माजी खासदार अजय संचेती, आ.परिणय फुके यांच्यासह मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री, गडकरी, बावनकुळे, फुके हे तर संघ गणवेशात उपस्थित होते. समाजातील सर्व समस्यांचे निराकरण केवळ शासन करू शकते किंवा केवळ आंदोलनांतूनच उपाय निघू शकतात, असे नाही. समाजाचा सक्रिय सहभाग आणि परस्पर संवादातूनही प्रश्न सुटू शकतात, असे भागवत यांनी नमूद केले. आंदोलनामागे देश आणि समाज आपला आहे, त्याच्या व्यवस्थेची जबाबदारी आपलीही आहे, ही भावना असावी. मात्र, आंदोलन राजकीय हत्यार बनल्यास आणि अन्यायाची भावना सातत्याने भडकवून व्यवस्थेविषयी अविश्वास निर्माण केल्यास त्याचा फायदा देशाला दुबळे करू इच्छिणार्‍या शक्तींना होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

Back to top button